पारनेरचा कांदा लंडनला निर्यात

व्यापारी कांदा घेत नसल्याने या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न होता. मात्र डेरे यांनी हा कांदा खरेदी करत योग्य भाव देखील दिला आहे. हा कांदा शेतावरून नेत असताना त्यांनी हमाली, मजुरी व गोण्यांचे पैसे देखील घेतले जात नाहीत. - सुभाष गलांडे, शेतकरी, कळस, जि. नगर.
लंडन येथे पाठविण्यासाठी कांदा भरताना कामगार.
लंडन येथे पाठविण्यासाठी कांदा भरताना कामगार.

टाकळी ढोकेश्वर, जि. नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्याने आणि बाहेरील व्यापारी माल घेत नसल्याने शेतक-यांना शेतीमाल घरोघरी जाऊन विक्री करावी लागत आहे. मात्र यावर प्रसन्ना कृषी उद्योग समुहाने पुढाकार घेतला आहे. शेतक-यांचा कांदा योग्य भावाने खरेदी करत हा कांदा समुद्रमार्गे लंडनला पाठविण्याचे काम या समुहाने सुरू केले आहे.

शेतक-यांच्या सोयीसाठी उद्योजक किरण डेरे व विकास गांधी यांनी पाडळी आळे (ता.पारनेर) येथे खाजगी कांदा मार्केट सुरू केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून मार्केटच्या माध्यमातून ते शेतीमालाला योग्य भाव देत आहेत. ‘कोरोना’मुळे सध्या बाहेर विक्रीसाठी ग्राहक उपलब्ध होत नाहीत आणि दक्षिणेतील काही राज्यांमध्ये आपला कांदा उतरून घेतला जात नाही. यामुळे व्यापा-यांना कांदा घेण्यासाठी परवडत नसल्याने बाजार समितीमध्ये शेतकरी कांदा घेऊन जात नाहीत. यामुळे या कांद्याचे करायचे काय हा प्रश्न शेतक-यांसमोर आहे. मात्र डेरे यांनी यावर उपाय शोधला आहे. ते शेतक-यांच्या शेताच्या बांधावर जाऊन हा कांदा खरेदी करत आहेत इतर ठिकाणी कांद्याला सहा ते आठ रुपये किलो भाव सुरू असताना नऊ रुपये किलो दराने कांदा खरेदी केला जात आहे.

शेतावर हा कांदा खरेदी करताना शेतकऱ्यांकडून गोणी, मजुरी, हमालीचे पैसे घेतले जात नाहीत. लंडनला निर्यात करण्यासाठी कंटेनरमध्ये २५ टन कांदा हा मजुरांमार्फत भरला जातो. कांद्याची निर्यात होत असल्याने पारनेर तालुक्यातील रांधा, दरोडी, कळस, पाडळी आळे, गारखिंडी, अळकुटी आदी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई येथे गेल्यानंतर जहाजामधून हा कांदा लंडन येथे रवाना करण्यात येतो. जवळपास २७ दिवस हा कांद्याचा कंटेनर पोहोचण्यासाठी जातात. दर आठ दिवसाला २५ टन कांदा येथून भरण्यात येतो. कांद्याचे अडीच किलोचे पॅकेट तयार करून भरून दिले जात आहेत.

आम्ही गेल्या पाच वर्षांपासून प्रसन्ना कृषी उद्योग समुहाच्या माध्यमातून शेतक-यांना कांद्याचा योग्य भाव देत आहोत. आताही ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर हा कांदा शेताच्या बांधावर जाऊन खरेदी करीत आहोत व योग्य भाव देखील देत आहोत, असे श्री. डेरे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com