बुध, जि. सातारा ः गेल्या चार दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व पहाटे पडणा-या दव आणि दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा व बटाटा पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. फवारण्या करून पीक वाचविण्यासाठी सध्या खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. चार दिवस कोरडे तर चार दिवसानंतर तयार होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे खरिपापाठोपाठ आता रब्बी हंगामही वाया जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
सततचे ढगाळ वातावरण आणि थंडीच्या अभावामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा कांदा, बटाटा आदी पिकांवर मावा, तुडतुडे व करप्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी उत्तर खटाव परिसरातील शेतकरी फवारण्या करताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळी स्थितीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. खरिपाच्या भरवशावर अनेक स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या शेतकऱ्यांचा परतीच्या पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके कापणीच्या अवस्थेत असतानाच परतीच्या पावसाने थैमान घालून होत्याचे नव्हते केले.
या संकटातून सावरून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने रब्बी हंगामाच्या तयारीला लागले. पेरणीनंतर पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र पिकांच्या ऐन वाढीच्या काळात पहाटेचे दव, धुके व ढगाळ वातावरणामुळे पिके अडचणीत आली आहे. असेच वातावरण काही दिवस टिकून राहिले तर खरिपाप्रमाणे रब्बी हंगामातील पिके देखील वाया जाण्याची चिंता शेतक-यांमधून व्यक्त होत आहे.
सततच्या प्रतिकूल हवामानामुळे गहू पिकावर मावा, तांबेरा, हरभ-यावर घाटेअळी, ज्वारीवर चिकट्याचा तर कांदा बटाटा पिकावर करप्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यात गहू, हरभरा, कांदा पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली थंडी फेब्रुवारी महिन्यापर्यंत गायब असल्याने पिकांवर याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होणार असल्याने तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. अशी आहे स्थिती
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.