ज्वारी उत्पादन यंदाही आतबट्ट्यातच

जिल्ह्यात ज्वारीचे पीक घेतले जाते. यंदा पाऊस झाल्याने हे पीक चांगले येईल अशी आशा होती. मात्र रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन कमी मिळत आहे. कडबा निघत असला तरी तो काळा पडलेला आहे. रोगामुळे ज्वारीचा रंगही काळवंडला असून बाजारात त्याचा दरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकरीही अडचणीत आहेत. - प्रशांत गायकवाड, सभापती, बाजार समिती, पारनेर, जि. नगर
प्रतिकूल हवामान, रोगांच्या प्रादुर्भावामुळे ज्वारी पिकाचे उत्पादन घटले आहे
प्रतिकूल हवामान, रोगांच्या प्रादुर्भावामुळे ज्वारी पिकाचे उत्पादन घटले आहे

नगर ः दोन वर्षं दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा जोरदार परतीचा पाऊस झाल्याने ज्वारीची सुगी चांगली साधेल असा अंदाज ज्वारी उत्पादकांचा होता. मात्र पीक हाती येऊ लागल्यानंतर हा अंदाज फोल ठरत आहे. हवामान बदल आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा ज्वारी उत्पादनात घट झाली असून, उत्पादन खर्च आणि उत्पन्न यातील तफावत पाहता यंदाही ज्वारीचे पीक आतबट्ट्यात आहे. रोगाच्या प्रादुर्भावाने दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात सुमारे पन्नास टक्के घट झाली आहे. चाऱ्याचे उत्पादन झाले असले तरी रोगामुळे कडब्याचा दर्जाही फारसा चांगला नसल्याचे दिसत आहे. 

राज्यातील नगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली आदींसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. राज्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर आहे. यंदा त्यापैकी ७१ टक्के म्हणजे १८ लाख ८८ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. राज्यासह नगरच्या बहुतांश भागांत गेल्या दहा वर्षांत सातत्याने पाणीटंचाई, पुरेसा पाऊस नसल्याचा फटका ज्वारी उत्पादनाला बसत आहे. गेली दोन वर्ष दुष्काळातच गेली होती. त्यामुळे पेरणीचे क्षेत्र सरासरीच्या तुलनेत थेट ५० टक्क्यांवर आले होते. त्यातही अनेक भागांत पाण्याअभावी पेरलेली ज्वारी जागेवर करपून गेल्याने उत्पादनात मागील काही वर्षाच्या तुलनेत ७० ते ७५ टक्के घट झाली होती.  

यंदा पावसाळ्यात पुरेसा पाऊस नसला तरी परतीच्या काळात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ज्वारीच्या क्षेत्रात पुन्हा वाढ होईल असा अंदाज होता. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत क्षेत्रात दहा ते पंधरा टक्के वाढ झाली. मात्र क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत अपेक्षित वाढ झाली नाही. ज्वारीचे पीक चांगले आले होते. यंदा ज्वारीची सुगी साधेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. मात्र तो फोल ठरला आहे.

पोठरीत ज्वारी आली आणि वातावरण सतत बदलत राहिले. त्यामुळे चिकटा, करपा, माव्याचा पिकावर प्रादुर्भाव झाला. सध्या ज्वारीची काढणी सुरू आहे. जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी एकरी दहा ते चौदा क्विंटल उत्पादन मिळते. यंदा मात्र ते एकरी तीन ते चार क्विंटलच उत्पादन निघत आहे. त्यामुळे हे उत्पादन पाहता खर्चही निघणार नसल्याने ज्वारीचे पीक यंदाही आतबट्ट्यातच आहे, असे चिचोंडी पाटील येथील शेतकरी शैलजा ठोंबरे यांनी सांगितले. 

ज्वारीचे नगर जिल्ह्यातील वर्षनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्‍टर)
२०११-१२ २,८१,०००
२०१२-१३ ४,४४,७६३
२०१३-१४ ४,४४,८००
२०१४-१५   ४,४३,५२३
२०१५-१६ ५,३३,३५२
२०१६-१७ ३,२५,९००
२०१७-१८  २,८९,३९०
२०१८-१९ १,८५.७७९ 
२०१९-२०  २,६६,८००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com