नांदेड जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरवर रब्बी पेरणी

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांमुळे सिंचन स्रोतांमधील पाणीपातळीत मोठी वाढ झाली. फरदडमुक्त अभियानातंर्गत कपाशीनंतर शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणासोबत बैठका घेऊन नियोजन केले. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील रब्बीच्या क्षेत्रात दुप्पट वाढ झाली. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड  : नांदेड जिल्ह्यात या वर्षीच्या (२०१९-२०) रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर असताना गुरुवारअखेर (ता. ६) २ लाख ७४ हजार ३२८ हेक्टरवर (२००.६६ टक्के) पेरणी झाली आहे. हरभरा आणि ज्वारीच्या क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर आहे. यामध्ये रब्बी ज्वारीच्या २६ हजार ९७५, गव्हाच्या ३८ हजार ५३८, मक्याच्या ३ हजार १७८, हरभऱ्याच्या ६२ हजार ३४९, करडईच्या ४ हजार ७६८ हेक्टरचा समावेश आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली. मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांमध्ये पुरेसा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बीच्या पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. एकूण २ लाख ७४ हजार ३२८ हेक्टरवर (२००.६६ टक्के) पेरणी झाली आहे. यंदा शेतकऱ्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिल्यामुळे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रामध्ये तिपटीहून अधिक वाढ झाली आहे.

हरभऱ्याची एकूण १ लाख ९१ हजार ३२१ हेक्टरवर (३०६.८५ टक्के) पेरणी झाली आहे. ज्वारीच्या पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला असून १२३.३५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गव्हाच्या क्षेत्रात किंचित घट झाली असून ९८.५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तेलवर्गीय पीकांमध्ये करडईच्या क्षेत्रातील घट यंदाही कायम आहे. जवस, सूर्यफूल, मोहरी या पिकांची काही प्रमाणात पेरणी झाली आहे. मुखेड तालुका वगळता इतर १५ तालुक्यांतील पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे.  

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका सर्वसाधारण क्षेत्र  पेरणी क्षेत्र  टक्केवारी
नांदेड  १८,५१२  २०,३१०  १०९.७१
मुदखेड  ५७२०   १०,८१४ १८९.०६
अर्धापूर  ५५७२ १७,११५ ३०७.१६
हदगाव १३,६५६  २९,८२४ २१८.३९
माहूर  ३६३० ५२३४  १४४.१९  
किनवट ५३८४   १८,५३५ ३४४.२६
हिमायतनगर १०,५६२ १८,२३९ १७२.६९
भोकर  ५९३१ ९८०५  १६५.३२
उमरी ४२९३  ७३५३  १७१.२८
धर्माबाद ४७५२  १८,४०९ ३८७.३९
नायगाव १२,४८५  २५,७७७  २०६.४६  
बिलोली १२,७५२ ३३,४१६  २६२.०५
देगलूर १०,१८८   २१,४०६  २१०.११
मुखेड  १०,६८९  १०१.२८ ९४.७५
 कंधार  ७४६५ १६,७१७ २२३.१४
लोहा   ५१२९   ११,२७४   २२०.१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com