लातूर जिल्ह्यात पोलिसांनी बांधावर जात मिटविले ३०६ तंटे

लॉकडाउनच्या काळात शेतीचा बांध, सामाईक शेती, शेतरस्ते, सामाईक नाले तसेच अन्य शेतीच्या कारणांवरून मारहाणीच्या गुन्ह्यांची प्रकरणे वाढू लागली. ही बाब पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत पंधरा दिवसांची मोहीम राबवून पोलिस कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवले. पाचशे गावांमध्ये जात प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेत तेथेच ३०६ तंटे मिटवले गेले.
लातूर जिल्ह्यात पोलिसांनी बांधांवर जाऊन शेतीचा बांध, सामाईक नाले आदींचे तंटे मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.
लातूर जिल्ह्यात पोलिसांनी बांधांवर जाऊन शेतीचा बांध, सामाईक नाले आदींचे तंटे मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

लातूर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात अनेक लोक बाहेरगावाहून गावाकडे आले. या काळात शेतीचा बांध, सामाईक शेती, शेतरस्ते, सामाईक नाले तसेच अन्य शेतीच्या कारणांवरून मारहाणीच्या गुन्ह्यांची प्रकरणे वाढू लागली. ही बाब पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत पंधरा दिवसांची मोहीम राबवून पोलिस कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवले. पाचशे गावांमध्ये जात प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेत तेथेच ३०६ तंटे मिटवले गेले. ‘कोरोना’च्या काळात राज्यातील पोलिसांकडून राबवला गेलेला हा पहिलाच उपक्रम ठरला आहे. यातून तंटे मिटवण्यासोबतच मने जुळवण्यातही पोलिसांना यश आले आहे. 

५०७ गावांतील बांधांवर गेले पोलिस  जिल्ह्यात पोलिस अधीक्षक डॉ. माने यांच्या आदेशानुसार जूनमध्ये पंधरा दिवस ग्रामभेटीच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आली. यात नऊ पोलिस निरीक्षक, १३ सहायक पोलिस निरीक्षक, १९ पोलिस उपनिरीक्षक तर ६९ पोलिस कर्मचारी असे एकूण ११० पोलिस अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील ५०७ गावांतील बांधांवर गेले. मार्चपासून लॉकडाउनमध्ये पोलिस रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यात ही मोहीम त्यांनी राबवली आहे.

जागेवरच मिटविले ३०६ तंटे गावागावातील शेतरस्ते, शेतीचे बांध, शेतातील नाले, जमिनींचे वाद याची माहिती पोलिसांनी एकत्र केली. गावातील प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेत पंधरा दिवसांत ३०६ तंटे जागेवरच मिटवण्यात पोलिसांना यश आले आहे. यातून नागरिकांची आपापसातील भांडणे मिटवत मने जुळवण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

गुन्हे टळले अन् खर्चही वाचला शेतीचा बांध, शेतरस्ता, नाला यातून शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. यातून मारामारीचे प्रकार घडून पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद केले जातात. वर्षानुवर्षे ही प्रकरणे न्यायालयात चालतात. यात दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो. इतकेच नव्हे तर पिढ्यानपिढ्या याचे परिणाम दिसून येतात. पण पोलिसांच्या या उपक्रमामुळे भविष्यात दाखल होणारे गुन्हे तर टळलेच, पण संबंधित शेतकऱ्यांचा खर्चही वाचण्यास मदत झाली आहे.

आकडे बोलतात..
उपविभाग गावभेटी मिटविलेले तंटे 
लातूर शहर १३
लातूर ग्रामीण ७३ ४४
औसा १०६ ६६ 
निलंगा ११५ ५३ 
चाकूर ४१ ४१
अहमदपूर १४९ ८५
उदगीर ग्रामीण १० १४ 
एकूण ५०७ ३०६

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात अनेकांनी गाव गाठले. यातून शेतीशी निगडित अनेक प्रश्न समोर आले. बांधावरून मारामारीच्या घटना वाढल्या गेल्या. भविष्यात या घटना वाढू नयेत म्हणून ही मोहीम राबवण्यात आली. त्याला चांगले यश आले. ३०६ तंटे मिटवता आले आहेत.     — डॉ. राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक, लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com