लातूर जिल्ह्यात चोवीस जणांना विकला ७१९८ पोते युरिया

लातूर ः शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या युरिया खताच्या विक्रीत महाघोटाळा झाल्याचे आता समोर येत आहे. यात जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांनी फक्त २४ जणांना ७१९८ पोते युरिया खत विक्री केल्याची माहिती उघड झाली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

लातूर ः  शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या युरिया खताच्या विक्रीत महाघोटाळा झाल्याचे आता समोर येत आहे. यात जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांनी फक्त २४ जणांना ७१९८ पोते युरिया खत विक्री केल्याची माहिती उघड झाली आहे. यात तर एकाच महिलेने आठशे क्विंटल युरिया खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे. एकीकडे सामान्य शेतकऱ्यांना दोन- दोन दिवस रांगेत उभे राहूनही खत मिळत नाही, तर दुसरीकडे दुप्पट दराने बाजारात खत सहज उपलब्ध होते. मग कागदोपत्री असे २४ नशीबवान शेतकरी समोर येतात. हे शेतकरी अस्तित्वात आहेत की नाही हा प्रश्न आहे. या प्रकरणाची आता तपासणी सुरू करण्यात आली आहे. पण ही चौकशी होऊन संबंधित अधिकारी व कृषी सेवा केंद्रांवर कारवाई होणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.   

चालू खरीप हंगामात १ एप्रिल ते ३० जुलै या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यातील युरिया खरेदीदारांपैकी सर्वांत जास्त खरेदी केलेल्या २० युरिया खरेदीदारांची तपासणी करावी, अशा सूचना केंद्र शासनाने ५ आॅगस्टला राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना दिल्या होत्या. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार आता सर्व जिल्ह्यातील ही माहिती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. यात लातूर जिल्ह्यात केवळ २४ जणांना ७१९८ पोते युरिया खत विकल्याचे समोर आले आहे. ही प्राथमिक माहिती आहे. यात आणखी बराच घोटाळा असण्याची शक्यता आहे.

शासनाकडून आॅगस्टअखेरपर्यंत जिल्ह्याला १८ हजार ५४७ पोते युरियाचा पुरवठा करण्यात आला आहे. शासनाचे अनुदान असल्याने युरियाचे ४५ किलोचे पोते २६५ रुपयांना विकले जाते. पण दरवर्षी प्रमाणे यंदाही काळ्या बाजारात ४०० ते ५०० रुपयांना एक पोते  याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना युरिया खरेदी करावा लागला आहे. शेतकऱ्यांना यात मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. तर दुसरीकडे केवळ २४ लोकांना ७१९८ पोत्यांची विक्री झाल्याचे आता समोर आले आहे.

जिल्ह्यातील खत विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आहे. यात एका शेतकऱ्याला किती खत द्यावे याचेही काही नियम आहेत. पण येथे मात्र सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. यात एका महिलेने सुमारे आठशे क्विंटल (एक हजार ७७६ पोते) युरिया खरेदी केला आहे. म्हणजे या महिलेच्या नावावर किती शेती असेल हाही प्रश्न आता निर्माण झाला आहे. उर्वरित २३ खरेदीदारांच्या नावावरही किती शेती आहे? हे खरेदीदार खरेच अस्तित्वात आहेत का याची आधार कार्डआधारे पडताळणी होण्याचीही गरज आहे.

हेच ते नशीबवान शेतकरी प्रतिभा मेडेवार १७७६, तानाजी जांबकर ५२२, लक्ष्मी गायकवाड ४१५, वैभव मुंडे ३६०, रवि गुट्टे ३३९, ज्ञानोबा साळुंके २८०, ज्ञानेश्वर शिंदे २७०, विकास सरवदे २५५, अनिल पेटकर २४१, सोपान वाघमोडे २३९, सुनील बोडखे २३२, शिवकुमार बावगे २००, अरविंद राठोड १९०, संदीपान बने १९०, चैतन्या तळे १८८, अनिकेत सांगवे १८०, गोविंद सोनवणे १८०, शिवाजी कांबळे १७७, लक्ष्मण मुंडे १६४, बालाजी धुमाळ १६०, ज्ञानोबा सुकरे १६०, खंडू माने १६०, प्रवीण राठोड १६०, सुधन पवळे १६० अशी एकूण ७१९८ पोते युरिया खरेदी या २४ जणांनी केल्याचे दाखवण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com