परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि पट्टणचेरू, हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्ध कोरडवाहू उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था (इक्रिसॅट) यांच्या संयुक्त संशोधन प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या खरीप ज्वारीच्या ‘परभणी शक्ती’ या लोह आणि जस्ताचे अधिक प्रमाण असलेल्या जैवसमृद्ध (बायोफोर्टिफाइड) वाणांचे प्रसारण नुकतेच इक्रिसॅटमध्ये करण्यात आले. या वेळी इक्रिसॅटचे महासंचालक डॉ. पीटर कारबेरी, वनामकृविचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांची प्रमुख उपस्थिती होती. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, उपमहासंचालक डॉ. किरण शर्मा, संशोधन संचालक डॉ. पी. एम. गौर, ज्वारी पैदासकार डॉ. शिवाजी म्हेत्रे, डॉ. अशोक कुमार आदींसह विविध पिकांचे पैदासकार उपस्थित होते. खरीप ज्वारीचा हा देशातील पहिलेच जैवसमृद्ध वाण ठरले आहे. या वाणाच्या धान्यांमध्ये लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हा वाण महिला, लहान मुलांतील कुपोषमुक्तीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या संशोधनाबद्दल डाॅ. पीटर कारबेरी यांनी कुलगुरूसह शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. डॉ. ढवण म्हणाले, की या वाणांचे मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन घेऊन शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल. या वेळी मानोली (ता. मानवत, जि. परभणी) येथील प्रगतिशील शेतकरी मदन महाराज शिंदे, सुनंदाताई शिंदे, गणेश घाडगे, अहिल्याबाई शिंदे आदींनी त्यांच्या शेतावर घेतलेल्या परभणी शक्ती या वाणांच्या प्रात्यक्षिकांचे अनुभव सांगितले. या शेतकऱ्यांना परभणी शक्ती वाणाचे बियाणेवाटप करण्यात आले.
वाणाची वैशिष्ट्ये या वाणांमध्ये लोहाचे प्रमाण प्रतिकिलो ४४ ते ४६ मिलिग्रॅम तर जस्त प्रतिकिलो ३२ ते ३३ मिलिग्रॅम आहे. भाकरीची प्रत चांगली आहे. कडबा उच्च प्रतीचा आहे. धान्य उत्पादन प्रतिहेक्टरी ३६ ते ३८ क्विंटल आणि कडब्याचे उत्पादन १०५ ते ११० क्विंटल आहे. हा वाण खोडमाशी, खोडकीड व काळ्या बुरशी रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणांच्या गेली चार वर्षे राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर चाचण्या घेण्यात आल्या.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.