सांगली : द्राक्षच्या उत्पादन खर्चातच ९०० कोटींचा फटका

द्राक्ष नुकसान
द्राक्ष नुकसान

सांगली : चार वर्षांपासून जिल्ह्यात उन्हाळ्यात द्राक्षे बागा टँकरवर जगविल्या जात आहेत. मात्र, यंदा मॉन्सूनोत्तर पावसाने द्राक्ष शेतीला मोठा फटका दिला. सुमारे १ लाख ५० हजार क्षेत्रापैकी ३० हजार एकर पेक्षा जास्त क्षेत्र पावसात नुकसान झाले आहे. एकरी किमान तीन लाखांचे उत्पन्न धरल्यास जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना उत्पादन खर्चापोटी तब्बल ९०० कोटींचा फटका बसला आहे. 

जिल्ह्यात साधारण दीड लाख एकरावर द्राक्ष शेती केली जाते. या द्राक्षाचा छाटणीचा हंगाम सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात सुरू होतो. मध्यंतरी पाऊस थांबल्यानंतर तासगाव, मिरज, पलूस, जत, खानापूर, वाळवा या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी छाटण्या मोठ्या प्रमाणात घेतल्या आहेत. या द्राक्ष बागांवर डावण्या, फळकुज व अन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तर काही बागायतदार चांगल्या दराच्या आशेवर जुलै ऑगस्टमध्ये आगाप छाटणी घेतात, त्यांच्या फळ अवस्थेतील द्राक्षांवर आता बुरशीजन्य डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे केवळ रात्रंदिवस कीटकनाशक फवारणी करणे एवढेच काम शेतकऱ्यांचे सुरू आहे.

जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव, खानापूर, आटपाडी आणि मिरज पूर्व भागांत मोठा फटका बसला. त्यात द्राक्ष बागेसाठी असलेली पीकविमा योजना केवळ कंपनीच्याच फायद्याची ठरत आहे. त्यातील निकष जाचक आहेत, त्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे कितीही नुकसान झाले, तरी योग्य नुकसानभरपाई मिळत नाही. साधारणतः ३० हजार एकरावरील द्राक्ष शेतीचे नुकसान झाले आहे. सरासरी ३ लाख रुपये एकरी उत्पन्न धरल्यास हा आकडा सुमारे ९०० कोटी रुपयांवर जातो, तर महापूर आणि परतीचा पाऊस असे नुकसान बघितल्यास तो आकडा सुमारे ७९०० कोटी रुपयांपर्यंत जातो.

द्राक्षे पिकासाठी एकरी खर्च मोठा सांगली जिल्ह्यात नाशिकच्या बरोबरीने द्राक्ष उत्पादन घेतले जाते. नदीकाठावर ऊस हे नगदी पीक आहे, तर कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून दुष्काळी भागात द्राक्षे पिकविली जातात. त्याचा एकरी उत्पादन खर्चही मोठा आहे. तो पहिल्या वर्षी सरासरी एकरी २ ते अडीच लाख तर त्यानंतर एक ते दीड लाख इतका खर्च येतो.  निर्यातक्षम द्राक्षांची विशेषतः युरोपला निर्यात होणाऱ्या द्राक्षांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. २० सप्टेंबरच्या आधी द्राक्ष छाटणी घेतलेल्या निर्यातक्षम बागा बुरशीजन्य रोगाला बळी पडल्या आहेत. त्यानंतर छाटणी झालेल्या बागांचे पीक पुढे कसे येणार? हे तज्ज्ञही सांगू शकत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील यावर्षीचे निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन ३० ते ५० टक्‍क्‍यांनी घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. युरोप आणि अन्य देशांमध्ये निर्यात होणाऱ्या द्राक्षांचे सुमारे ५० ते ७० कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय ही द्राक्ष वाचण्यासाठी होणारा खर्चही वाढत आहे. त्यामुळे भविष्यात निर्यातक्षम द्राक्षांची किती निर्यात होणार ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com