खानदेशात पावसाची प्रतीक्षा कायम, शिरपुरात जोरदार सलामी

खानदेशात पावसाची प्रतीक्षा कायम, शिरपुरात जोरदार सलामी
खानदेशात पावसाची प्रतीक्षा कायम, शिरपुरात जोरदार सलामी

जळगाव ः खानदेशात जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीलायक पाऊस नसल्याने बियाणे तसेच पडून आहेत. शिरपूर (जि. धुळे), नंदुरबार, शहादा (जि. नंदुरबार) या भागात बऱ्यापैकी पाऊस झाल्याची माहिती आहे.  जळगाव जिल्ह्यात अपवाद वगळता कुठेही मंगळवारी (ता. २५) जोरदार पाऊस झाला नाही. चोपडा, यावल, रावेर भागांत काही शेतकऱ्यांनी ज्वारी, सोयाबीनची पेरणी केली आहे; परंतु त्यावर जोरदार सरी कोसळण्याची प्रतीक्षा आहे. कोरडवाहू कापसाची लागवड चाळीसगाव, पाचोरा, पारोला, जामनेर, जळगाव भागात सुरू झालेली नाही. काही शेतकऱ्यांनी काळ्या कसदार क्षेत्रात मक्‍याची लागवड सुरू केली आहे. नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार व अक्कलकुवा भागांत मागील दोन दिवस जोरदार व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तर धुळे जिल्ह्यातील शिरपुरातही अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. शिरपूर तालुक्‍यात जुने भामपूर (ता. शिरपूर) येथे झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पांढरीच्या नाल्याला पूर आला. त्यामुळे नाल्यालगत असलेली खळवाडी वाहून गेली. यात तीन बैल, दोन म्हशी, एक गाय व दोन पारडू अशी आठ जनावरे वाहून जात मृत्युमुखी पडली, तर अनेक शेतकऱ्यांचा चारा, खते, शेती अवजारे वाहून गेली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.  सुरवातीपासून जोरदार सरी कोसळत होत्या. पावसाचा जोर वाढल्यानंतर नाल्याला पूर आला. नाल्याच्या काठावरील खळवाडीला पुराच्या पाण्याने वेढा घातला. काही वेळाने पाण्यासोबत खळवाडी वाहून गेली. पाण्यासोबत गाळही वाहून आल्याने खळवाडीत बांधलेली जनावरेही वाहून गेली. यात गाळात रुतून तीन बैल व दोन म्हशी मृत्युमुखी पडल्या. गेल्या ४० वर्षांत प्रथमच असा पूर पाहिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुराच्या पाण्यामुळे नाल्याकाठी असलेले वीज कंपनीचे रोहित्रही बुडाले. काठावरून गेलेले वीजखांब कोसळले. नाल्याकाठी महिलांसाठी असलेल्या शौचालयाची संरक्षक भिंतही कोसळली. काठावर असलेल्या काही घरांमध्ये पाणी शिरले. मात्र, सुदैवाने हानी झाली नाही. ४८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, तीन लाख ८० हजारांची आठ जनावरे दगावली. तसेच गोठ्यांची पडझड झाली. चारा, खत, शेती अवजारे वाहून गेल्याने सुमारे दोन लाख ६० हजारांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  वाघाडी परिसरातही मुसळधार  शिरपूर तालुक्‍यातील वाघाडी, अर्थे, विखरण, भामपूर, जवखेडा, वरूळ, भटाणे, तऱ्हाडकसबे परिसरांतही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नाले भरून वाहत असून, बहुतांश शेतीही पाण्याखाली आहे. तसेच जळगाव तालुक्‍यातील बिलवाडी, डोमगाव, पाथरी भागातही मंगळवारी (ता. २५) रात्री जोरदार पाऊस झाल्याची माहिती मिळाली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com