सातारा जिल्ह्यात यंदा २८२५ हेक्‍टरवर फळबाग लागवड

फळबाग लागवड
फळबाग लागवड

सातारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१८-१९ मध्ये सातारा जिल्ह्यात २८२५ हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत उद्दिष्टात १७१४ हेक्‍टरने घट करण्यात आली आहे. गतवर्षी ४५३९ हेक्‍टरवर फळबाग लागवडीचा लक्ष्यांक होता. त्यापैकी ८४०.५७ हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

फलोत्पादन संचालनालय, ग्रामपंचायत व कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पडीक जमीन, सलग जमीन व बांधावर फळबाग लागवडीसाठी ‘मनरेगा’तून प्रोत्साहन देण्यात येत आहे. २०१८-१९ साठी २८२५ हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक उद्दिष्ट खटाव तालुक्‍यास देण्यात आले असून या तालुक्‍यात ४९५ हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे नियोजन आहे.

फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कोकम, फणस, अंजीर, सुपारी या फळझाडांची लागवड केली जाते. लागवडपूर्व मशागत, लागवड, संगोपन करण्यासाठी मजुरी, रोपे, खते यासाठी तीन वर्षांच्या कालावधीमध्ये पीकनिहाय मापदंडानुसार निधी दिला जातो. मजुरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तर खते आणि रोपांसाठीचा निधी संबंधित एजन्सीच्या खात्यावरून थेट जमा करण्यात येतो.

जिल्ह्यात जलसंधारणाची कामे झाल्यामुळे पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. गतवर्षी ४५३९ हेक्‍टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यावर्षी मात्र एकूण क्षेत्र कमी करत २८२५ हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी विभागाकडून नियोजन केले जात असून, प्रत्येक कृषी सहायकासाठी लक्षांक निश्‍चित केला जात आहे.

तालुकानिहाय लागवड क्षेत्र उद्दिष्ट (हेक्‍टर) ः सातारा २७७, कोरेगाव २०२, खटाव ४९५, कऱ्हाड २१९, पाटण ४३५, वाई २०७, जावली १६४, खंडाळा ७४, महाबळेश्वर १३८, फलटण २१७, माण ३९६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com