राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावर

राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावर
राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावर

पुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात गारठा वाढू लागला आहे. गुरुवारी (ता. १४) सकाळी राज्याच्या किमान तापमानात पुन्हा घट झाल्याचे दिसून आले. नगर येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील नीचांकी १२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. कोकण वगळता सर्वच ठिकाणी तापमान २० अंशांच्या खाली घसरल्याने थंडीची चाहूल लागली आहे.  दोन दिवसांपासून राज्याच्या कमान आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. दिवसभर उन्हाचा चटका वाढून काहीसे ढगाळ हवामान होत असल्याने उकाडा जाणवत आहे. तर दोन दिवस किमान तापमानातही काहीशी वाढ झाली होती. मात्र गुरुवारी विदर्भ, मराठवाडा, विदर्भाच्या किमान तापमानात पुन्हा मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी तापमान सरासरीच्या खाली उतरले आहे. जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येऊन शनिवारपर्यंत किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.  गुरुवारी (ता. १४) उत्तर प्रदेशातील चुर्क येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात नगरसह महाबळेश्‍वर, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, विदर्भातील नागपूर, यवतमाळ येथे तापमान १५ अंशांच्या खाली आले आहे. तर पुणे, नाशिक, नांदेड, अकोला, बुलडाणा, गोंदिया, वर्धा येथे तापमान १५ अंशांच्या जवळपास आहे. कोकणात सर्वच ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या वर आहे. आज राज्यात मुख्यत: कोरड्या व थंड हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.       गुरुवारी (ता. १४) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.३ (१), नगर १२.१ (-३), जळगाव १६.६(१), कोल्हापूर १८.६(१), महाबळेश्वर १३.४(-१), मालेगाव १७.० (२), नाशिक १५.२ (१), सांगली १८.० (०), सातारा १६.० (२), सोलापूर १९.२ (१), अलिबाग २२.७ (१), डहाणू २३.७ (२), सांताक्रूझ २२.० (१), रत्नागिरी २१.० (-१), औरंगाबाद १२.६ (-३), परभणी १४.७ (-२), नांदेड १५.५ (-१), उस्मानाबाद १३.० (-३), अकोला १५.२ (-२), अमरावती १५.८ (-२), बुलडाणा १५.० (-२), चंद्रपूर १७.६ (०), गोंदिया १५.४ (-१), नागपूर १४.४ (-२), वर्धा १५.४ (-१), यवतमाळ १४.० (-३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com