मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

पाणीटंचाई
पाणीटंचाई
औरंगाबाद  : गत आठवड्याच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत ५९ गाव वाड्यांची भर पडली आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्याऱ्या टॅंकरची संख्याही ७६ ने वाढली आहे. विहीर अधिग्रहणाची संख्याही १४२ ने वाढली आहे.
 
गत आठवड्यात मराठवाड्यातील ३२१ गावे व ५३ वाड्यांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत होते. सध्या ही संख्या ३६३ गावे व ७० वाड्यांवर पोचला आहे. या सर्व टंचाईग्रस्त गाव वाड्यांना ४७२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.
 
गत आठवड्यात टंचाईग्रस्त गाव वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३९६ टॅंकरची सोय करण्यात आली होती. त्यामध्ये आता ७६ टॅंकरची भर पडली आहे. गत आठवड्यात टॅंकरसाठी व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी ८६३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. आता ही संख्या १४२ ने वाढून १००५ वर पोचली आहे.
 
टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून, आटते जलस्रोत  अधिग्रहित विहिरींची संख्या वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यात टंचाईची तीव्रता सर्वाधिक असून जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व बीड जिल्ह्यातही पाणीटंचाई भासू लागली आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यात गत आठवड्यात ३०० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता या संख्येत २४ टॅंकरची भर पडली आहे. ३२४ टॅंकरच्या साह्याने २९७ गावे - वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त ८७ गावे गंगापूर तालुक्‍यातील आहेत. त्यापाठोपाठ सिल्लोड, वैजापूर, औरंगाबाद, खुल्ताबाद, कन्नड, पैठण, सोयगाव आदि तालुक्‍यातील गावांचाही टंचाईग्रस्त गावांमध्ये समावेश आहे. 

मराठवाड्यातील ४३३ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरसह थेट पाणीपुरवठा करण्यासाठी १००५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी ७६३ व टॅंकरसाठी अधिग्रहित केलेल्या २४९ विहिरींचा समावेश आहे. 

जिल्हानिहाय टॅंकरस्थिती

जिल्हा गाव-वाड्या टॅंकर
औरंगाबाद २९७ ३२४
जालना ४२ ४९
परभणी १७ १६
हिंगोली १२ ११
नांदेड ६० ६७
बीड ०५ ०५

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com