चासकमान धरणात फक्त अर्धा टीएमसी साठा

चासकमान धरणातील साठा
चासकमान धरणातील साठा

चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणात केवळ ७.२८ टक्के (०.५५ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला असून, धरणातून कालव्याद्वारे सुमारे ५८० क्‍युसेकने होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे.

खेड तालुक्‍यासह शिरूर तालुक्‍याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान धरणातील पाणीसाठा झपाट्याने मृत साठ्याकडे झेपावत आहे. २२ एप्रिलपासून धरणातून पाण्याचा होत असलेला विसर्ग अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पिण्याच्या पाण्याची गरज पाहता २२ एप्रिलपासून भीमा नदीपात्रात व कालव्याद्वारे ८५० क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत होते. नदी तीरावर असणाऱ्या गावांची पाण्याची गरज पूर्ण होताच नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले होते. परंतु, कालव्याद्वारे सोडण्यात येत असलेले आवर्तन आजही सुमारे ५८० क्‍युसेकने सुरू आहे. धरणात फक्त ७.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा काही दिवसांत संपणार आहे. त्यामुळे धरणात केवळ मृतसाठा शिल्लक राहणार आहे. कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी पिण्यासाठीच आहे. त्यामुळे कालव्यालगतच्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.

या आवर्तनामुळे धरणाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या कालव्यालगतच्या व नदीपात्रालगतच्या गावांना फायदा होत असला, तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणीटंचाई भेडसावत आहे. पाणलोट क्षेत्रातील मोरोशी, खरोशी, धुवोली, आव्हाट यांसह अन्य गावांमध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे पुन्हा धरणांतर्गत पाटबंधारे हा विषय जोर धरतो आहे.

‘पोटबंधाऱ्यांची जागा निश्‍चिती करा’ याबाबत पांडुरंग जठार म्हणाले, की निवडणुकीपूर्वी या टंचाईग्रस्त गावांनी एकत्र येत तालुक्‍याच्या ठिकाणी मोठा मोर्चाही काढला होता. सर्व शासकीय अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन धरणांतर्गत पोटबंधारे बांधण्याची मागणीही केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. सद्यःस्थितीत या गावांमध्ये पाणलोटचे पात्र कोरडे आहे. त्यामुळे पाहणी करून बंधाऱ्यांची जागा निश्‍चिती करण्याची गरज आहे. मात्र, सत्ताधारी लोकसभा निवडणुकीत मश्‍गुल आहेत. सामाजिक आपत्तीची जर वेळीच दखल घेतली नाही; तर भविष्यात हा चिंतनाचा विषय होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com