शेतकऱ्यांना चिरडल्याचा व्हिडिओ व्हायरल, देशभर संताप
शेतकऱ्यांना चिरडल्याचा व्हिडिओ व्हायरल, देशभर संताप

शेतकऱ्यांना चिरडल्याचा व्हिडिओ व्हायरल, देशभर संताप

लखीमपूर खेरीतील हिंसाचाराशी संबंधित काही कथित व्हिडिओ मंगळवारी (ता. ५) समाजमाध्यमांत व्हायरल झाल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून, सत्ताधारी भाजपची मोठी कोंडी झाली आहे.

लखनौ  ः लखीमपूर खेरीतील हिंसाचाराशी संबंधित काही कथित व्हिडिओ मंगळवारी (ता. ५) समाजमाध्यमांत व्हायरल झाल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून, सत्ताधारी भाजपची मोठी कोंडी झाली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, वरिष्ठ नेते राहुल गांधी, आपचे नेते संजय सिंह आणि भाजपचे वरुण गांधी यांनी हे व्हिडिओ शेअर करताना दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 

दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना स्थानिक पोलिसांनी २८ तास येथील विश्रामगृहात ताब्यात ठेवल्यानंतर त्यांना अटक केल्याचे समजते. प्रियांका गांधी यांच्यासह दीपेंदर हुडा, अजयकुमार लल्लू यांच्याविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून, दहा विविध कलमांखाली त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. शांततेला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांच्यावर ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करताना केंद्रावर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे सर्वेसर्वा जयंत चौधरी यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. 

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये काळे झेंडे दाखवून मंत्र्यांचा निषेध करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना चिरडत एक जीप भरधाव वेगाने पुढे जात असल्याचे दिसून येते, त्यामागेच एक काळी एसयूव्ही देखील आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये जीपमधील एक संशयित व्यक्ती गाडीतून उतरून पळून जाताना दिसत आहे. हीच व्यक्ती मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष असल्याचे काहींचे म्हणणे आहे. दरम्यान, तपास संस्थांनी मात्र या व्हिडिओला दुजोरा दिलेला नाही. लखीमपूर येथील हिंसाचारानंतर देशभरातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध केला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेण्यासाठी यूपीत आलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना चौधरी चरणसिंह विमानतळावर रोखून धरण्यात आले. पोलिसांच्या कारवाईनंतर त्यांनी विमानतळावरच धरणे आंदोलन सुरू केले. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचले असून, यूपीतील वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रामध्ये या घटनेची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी असे म्हटले आहे. 

दिवसभरात 

  •   यूपीतील हिंसाचाराच्या सीबीआय चौकशीची मागणी 
  •   पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी गृहमंत्री शहांना भेटणार 
  •   छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांना विमानतळावर रोखले 
  •   शिवसेना नेते संजय राऊत राहुल गांधींच्या भेटीला 
  •   लखीमपूर खेरीमध्ये व्यापारपेठा खुल्या, व्यवहार सुरू 
  •   केंद्रीय मंत्री अजय मिश्रांनी विरोधकांचे आरोप फेटाळले
  • प्रतिक्रिया... हा प्रसंग घडला तेव्हा मी अथवा माझा मुलगा घटनास्थळी नव्हतो. हे आम्ही सिद्ध करू शकतो. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. ज्यांनी हे सगळे घडवून आणले त्याला सोडले जाणार नाही. माझा मुलगा घटनास्थळी असता तर तो जिवंत राहिला नसता.  - अजय मिश्रा, केंद्रीय गृहराज्यमंत्री 

    शेतकऱ्यांचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले असताना लखनौमध्ये स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. आता देशवासीय कोणाला पाठिंबा देणार?  - दीपेंदर हुडा, खासदार काँग्रेस 

    लखीमपूरचे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात असून, राज्यामध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी.  - जयंत चौधरी, अध्यक्ष, राष्ट्रीय लोकदल 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com