अनधिकृत मासेमारीला ‘समुद्र कन्यां’चा लगाम

रत्नागिरीतील सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयात काम करणाऱ्या पाच महिलांनी परवाना अधिकारी म्हणून प्रत्यक्ष समुद्रात जाऊन अनधिकृत मासेमारीला लगाम लावलाअसून त्यांनी कडक कारवाईसाठी पावले उचलली आहे.
Unauthorized fishing is controlled by 'sea maidens'
Unauthorized fishing is controlled by 'sea maidens'

रत्नागिरी ः सद्यःस्थितीत महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविताना दिसत आहे. त्याचबरोबर मत्स्य विभागात ही महिलांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध केले आहे. रत्नागिरीतील सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयात काम करणाऱ्या पाच महिलांनी परवाना अधिकारी म्हणून प्रत्यक्ष समुद्रात जाऊन अनधिकृत मासेमारीला लगाम लावला असून त्यांनी कडक कारवाईसाठी पावले उचलली आहे. यामध्ये थेट परप्रांतीय नौकांवरही त्यांनी बेधडक कारवाई केली.

तसेच मत्स्य विभागाच्या विविध योजनांचा तळागाळातील मच्छीमारांना लाभ देण्यासाठी रत्नागिरीतील सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयात काम करणाऱ्या पाच महिलांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. मत्स्य विभागात प्रत्यक्ष समुद्रात जाऊन काम करण्यातही महिला मागे राहिलेल्या नाहीत. त्यातून त्यांनी दरारा निर्माण केलेला आहे. सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयात तीन वर्षांपूर्वी झालेल्या भरतीमध्ये काही महिलांच्याही नियुक्त्या झाल्या. मत्स्य महाविद्यालयातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांचा मास्टर अभ्यासक्रम पूर्ण केल्या या महिलांमध्ये दीप्ती साळवी, स्मितल कांबळे, उत्कर्षा कीर, भक्ती पेजे, तृप्ती जाधव यांचा समावेश आहे. परवाना अधिकारी पदावर कामकाज करत असताना गेल्या सहा महिन्यांत त्यांना पेट्रोलिंगसाठी बाहेर पडावे लागले. 

त्यातील दीप्ती साळवी यांच्याकडे हर्णे, दाभोळसारख्या मच्छीमारांसाठीच्या संवेदनशील बंदराची जबाबदारी आहे. सोयीसुविधांसाठी मच्छीमारांचे म्हणणे शासनापर्यंत पोचवतानाच कोकण किनाऱ्यावर सुरू असलेल्या अनधिकृत मासेमारीला आळा बसविण्याचे आव्हानही त्या तेवढ्याच ताकदीने पेलत आहेत. परप्रांतीय नौकांवर कारवाईचा बडगा उगारतानाच अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या काही स्थानिक मच्छीमारांना दणका दिला. पेट्रोलिंगसह कार्यालयीन कामकाज करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच घरातूनही मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे त्या पाच जणींकडून आवर्जून सांगितले जाते.

उत्कर्षा कीर यांनी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव सांगतानाच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेत रत्नागिरी जिल्ह्याला १५ कोटींवरून २५ कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यामुळे मच्छीमारांकडूनही चांगली वागणूक मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भक्ती पेजे यांनी अलिबाग (रायगड) येथे आदिवासी पाड्यात काम करत नीलक्रांती योजनेतून तेथील लोकांना लाभ देण्याचे काम केले. माशांच्या हॅचरी प्रकल्पाच्या प्रचारासाठीही त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. कमी वयामध्ये मंत्रालयातील विविध मंत्र्यांपुढे बैठकांना सामोरे जाण्याची वेळ आली होती. पण ती तेवढ्याच ताकदीने त्यांनी पेलली होती. परवाना अधिकारी पदावर काम करताना कर्ला (ता. रत्नागिरी) येथे कारवाई करताना महिला अधिकाऱ्याला रोखण्यासाठी महिलांना पुढे आणले गेले होते. सुरुवातीला भीती वाटत होती, पण हा नोकरीचाच भाग असल्यामुळे तेवढ्याच ताकदीने त्या जमावाला सामोरे गेले, असा अनुभव तृप्ती जाधव यांनी सांगितला.

परप्रांतीय नौकेवर कारवाई रत्नागिरीच्या हद्दीत परप्रांतीय नौकांचा धुडगुस घातला जात असल्याच्या तक्रारी हर्णे, दाभोळ परिसरातील मच्छीमारांकडून येत होत्या. एक दिवस जिल्ह्याच्या हद्दीत दोन मलपी (कर्नाटक) नौका मासेमारी करत असल्याची माहिती मिळाली. गस्तीनौका नौका घेऊन परवाना अधिकारी दीप्ती साळवी सरसावल्या. सोबत दोन मच्छीमार, तांडेल, सुरक्षा रक्षक होते. एक मच्छीमारी नौका पकडली. जवळच मासेमारी करणाऱ्या दुसऱ्या मलपी नौकेवरून अन्य नौकांवरील लोकांना संदेश दिला गेला. काही क्षणात झुंडीने अन्य नौका दाखल होऊ लागल्या. सोबत असलेल्या एका मच्छीमाराने तर कारवाई सोडा आपण माघारी जाऊयात अशी विनंतीही केली. पण दीप्ती साळवी ठामपण कारवाई केली. याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घेतली होती.

गस्तीवर अनेकदा ‘तू तू मै मै’ जिल्ह्याला लाभलेल्या १६० किलोमीटर किनारपट्टीच्या समुद्रात खोल समुद्रात १२ नॉटीकल मैलांपर्यंत महिन्यातून चार वेळा एका परवाना अधिकाऱ्याला गस्तीसाठी जावे लागते. या पाचही ‘समुद्र कन्या’ ती भूमिका लिलया पार पाडत आहेत. गस्तीबरोबरच बंदरातील नौकांवरील कागदपत्र तपासणीवेळीही अनेक मच्छीमारांकडून ‘तू तू मै मै’ होत होती. ही मुलगी आहे, ती काय करणार असे गृहीत धरत काहींनी आमच्या तपासणी मोहीमेकडे दुर्लक्ष केले; मात्र कारवाईचा बडगा उगारल्यावर त्यांच्याकडून सहकार्याची भूमिका घेतली जाऊ लागली असा अनुभव स्मितल कांबळे यांनी सांगितला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com