दोन दिवसांच्या पावसाने विस्कटली छावण्यांची घडी

दोन दिवसांच्या पावसाने विस्कटली घडी
दोन दिवसांच्या पावसाने विस्कटली घडी

नगर : पाऊस उशिराने आला, मात्र दोन दिवस झालेल्या पावसाने छावण्यांची मात्र घडी विस्कटली. पाऊस झाल्याने जिल्हाभरातील १२३ जनावरांच्या छावण्यांतील जनावरे घरी गेल्याने आता त्या छावण्या बंद झाल्या आहेत. मात्र घरी चारा नसल्याने जनावरे जगवण्याची चिंता कायम आहे. 

काही शेतकऱ्यांनी तर जनावरे घरी नेऊन पश्‍चाताप व्यक्त केला आहे. काहीसा पाऊस झाला असला तरी चारा तयार व्हायला अजून किमान महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. अगदी चार दिवसापर्यंत छावण्या सुरूच होत होत्या. ‘‘चांगला पाऊस पडेपर्यंत किंवा शासनाचे आदेश येईपर्यत छावण्या सुुरू राहतील’’ असे प्रशासनाकडून संघाकडून सांगण्यात आले होते. 

जून महिन्याच्या सुरवातीला ५०४ छावण्या सुरू होत्या. मात्र, गेल्या आठवड्यात दोन-तीन दिवस झालेल्या पावसाने छावण्यांची घडी विस्कटली आणि छावणीतील एक लाख ११ हजार २०३ जनावरे घरी नेल्याने १२३ छावण्या बंद झाल्या आहेत. सध्या ३८१ छावण्या सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. एकदा छावणी बंद झाल्याचा अहवाल सुरू झाला की पुन्हा सुरू करता येत नाही. मात्र, दोन-तीन दिवसांच्या पावसानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिली आहे. शिवाय घरीही चारा नसल्याने जनावरे जगवण्याचा प्रश्‍न कायम आहे. ज्यांनी जनावरे नेली त्यातील काही शेतकरी पश्‍चाताप व्यक्त करत आहेत. 

‘‘छावण्यांत हेळसांड होत असली तरी जनावरांना चारा मिळत होता. त्यामुळे जनावरे जगली’’ असे सांगत छावण्यांत थांबणे गरजेचे होते, असे मत व्यक्त केले. सध्या पावसामुळे बंद झालेल्या सर्वाधिक चारा छावण्या पाथर्डी तालुक्‍यातील आहेत. गतवर्षीच्या पावसाने हात आखडल्याने जिल्ह्यातील खरीप व रब्बीचा हंगाम बुडाला. नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच टंचाई परिस्थिती तीव्र होत गेली. ९५ टक्के विहिरी, तलाव आणि नद्या कोरड्या पडल्याने चारा व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात ५११ चारा छावण्यांना मंजुरी दिली होती. यापैकी जूनच्या सुरवातीस ५०४ छावण्या प्रत्यक्षात सुरू होत्या. त्यात दाखल झालेल्या पशुधनाची संख्या तीन लाख ३६ हजार २०३ इतकी झाली होती. २५ मेपासूनच शेतकरी पावसाचा धावा करू लागले.  आर्द्रा नक्षत्रात जिल्ह्यातील ९७ पैकी ९० महसूल मंडळांत पावसाची हजेरी लागली. त्यापैकी पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. ८५ महसूल मंडळांत सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यानंतरही पाथर्डी, शेवगावच्या काही भागांत पावसाची दमदार हजेरी लागली. त्यामुळे १२३ छावण्यांचा तळ मोडला आहे. त्यातील पशुधन घरच्या दावणीला गेले आहे. पाथर्डी तालुक्‍यात १०७ चारा छावण्या सुरू होत्या. 

पावसामुळे त्यापैकी ६२ छावण्या बंद झाल्या. त्यापाठोपाठ शेवगाव तालुक्‍यातील ४७ छावण्यादेखील बंद झाल्या आहेत. पाऊस झाला असल्याचे सांगितले जात असले तरी अजून किमान दीड महिना चारा उपलब्ध व्हायला अवधी लागणार आहे.

सध्या सुरू असलेल्या छावण्या 
कर्जत ९६
नगर ६६
श्रीगोंदे ५५
पारनेर ४१
नेवासे
पाथर्डी ४५
जामखेड ५५
शेवगाव १८
संगमनेर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com