सांगली बाजार समितीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटली

सांगलीतील बाजार समितीत स्थानिक हळदीची आवक २ लाख क्विंटलने कमी झाली असून परराज्यातील हळदीची आवकच झाली नाही.
turmeric
turmeric

सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद होत्या. याचा फटका हळद व्यापारावर झाला आहे. सांगलीतील बाजार समितीत स्थानिक हळदीची आवक २ लाख क्विंटलने कमी झाली असून परराज्यातील हळदीची आवकच झाली नाही. त्यामुळे बाजार समितीची २८० कोटींनी उलाढाल कमी झाली आहे. सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथल्या बाजारपेठेत स्थानिक, हळदीबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटकसह अन्य राज्यांतून हळद विक्रीसाठी शेतकरी येतात. हळदीची वर्षाकाठी सहाशे कोटी रुपयांची उलाढाल होते. २० जानेवारीला नव्या हळदीच्या सौद्यांना प्रारंभ झाला. हळदीची आवक कमी अधिक होती. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळदीच्या आवकीत वाढ झाली होती. परिणामी दरात चढ-उतार असल्याने शेतकऱ्यांनी हळद विक्री करण्याचे काही प्रमाणात थांबवले होते.दरम्यान, २२ मार्चपासून लॉकडाऊनला सुरवात झाली. त्याचा फटका बाजार समितीला बसला. बाजार समितीतील सौदे बंद करण्यात आले होते. त्यामुळे हळदीचे सौदे जवळपास ५० ते ५५ दिवस काढलेच नाही. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात नव्या हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते. यंदा याच कालावधीत उलाढाल थांबली.सांगलीच्या बाजार समितीत आंध्र प्रदेश, निजामाबाद, कडप्पा, डुगीराला, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होते. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परराज्यातील वाहतूक व्यवस्था बंद होती. यामुळे परराज्यातील हळदीची आवक झाली नाही. जिल्हा प्रशासन आणि बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने ई-नामद्वारे सौदे करण्याचा निर्णय घेतला. २९ एप्रिल पासून हळदीचे सौदे सुरु झाले. या ऑनलाइन सौद्यांना व्यापारी अडते आणि शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु परराज्यातील हळद सौद्यासाठी आली नाही. त्यामुळे ऐन हळदीच्या हंगामात स्थानिक आणि परराज्यातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणात घटली.

राजापूरी हळदीची एप्रिल ते सप्टेंबर मधील उलाढाल  २०१९  आवकः ६,४४,५९७ क्विंटल  सरासरी दर ः ७,८१८  उलाढाल ः ५०३,९४,५९ ,३४६ 

२०२०  आवकः ४,७,८८७ क्विंटल  सरासरी दर ः ७,२३२  उलाढाल ः २९४,९८,३८,७८४ 

तफावत 

  • २८० कोटी ९६ लाक २० हजार ५६२ ने उलाढाल कमी 
  • १ कोटी ७६ लाख १६ हजार ९६४ ने सेस कमी 
  • २,३६,७१० क्विंटलने आवक घटली
  • प्रतिक्रिया कोरोना विषाणूचा परिणाम स्थानिक आणि परराज्यातील हळदीच्या आवकेवर झाला. यामुळे हळदीची उलाढाल कमी झाली आहे. पुढील हंगामात बाजार समिती आणि अडते संयुक्त पद्धतीने बाजार समितीत हळदीची आवक कशी वाढेल, याचा निश्चित प्रयत्न केला जाणार आहे.  - दिनकर पाटील,  सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com