ताकारी योजनेने तीन तालुक्‍यांना तारले

ताकारी योजनेने तीन तालुक्‍यांना तारले
ताकारी योजनेने तीन तालुक्‍यांना तारले

सांगली : निसर्गाचा सतत प्रकोप असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्‍यांतील जनतेसाठी ‘ताकारी उपसा जलसिंचन योजना’ जगण्याचा आधार ठरली आहे. किंबहुना उन्हाळ्यात येणाऱ्या या शाश्वत पाण्यामुळे लाभक्षेत्राचा कायापालट झाला आहे. याचबरोबर येरळेतून वाहत असणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या पलूस तालुक्‍यातील गावांनाही ताकारीने पाणीटंचाई जाणवू दिली नाही.  

या वर्षी ताकारीची २४ आक्‍टोबर, १२ डिसेंबर आणि २ मार्च अशी तीन आवर्तने झाली. यामधून ५.३२ टीएमसी पाण्याचा उपसा झाला. तरीही ताकारीच्या वाट्याचे ४ टीएमसी पाणी कोयना धरणात शिल्लक आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बाब असून, पावसाळा लांबला तरी यानंतर आणखी एखादे आवर्तन सुरू होऊ शकते. यासाठी पाटबंधारेच्या नियोजनाची गरज आहे. 

यंदा उन्हाळ्याने कहर केला असून, पिकांना दोन दिवसाला पाणी द्यावे लागत आहे. सर्वत्रच पाण्यासाठी हाहाकार उडला असून, ताकारीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात मागणी आणि वाटपातील विस्कळितपणा, यामुळे काही वेळा शेतकरी आणि अधिकाऱ्यांत खटके उडाले. मात्र एकमेकांना समजून वाटचाल झाली. मागील ५ दिवसांपासून कडेगाव तालुक्‍यातील कुंभारगाव ते वांगीपर्यंत पाणीवितरण सुरू आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरही शाखा अभियंता संजय पाटील यांनी वितरणाचे नेटके नियोजन केले असल्याने ‘टेल टू हेड’ सर्वांना भरपूर पाणी मिळत आहे. त्यामुळे वांगी परिसरांतील शेतकरी या आवर्तनावर समाधानी आहेत. 

ताकारी योजनेसाठी कोयना धरणात ९.३४ टीएमसीसाठा राखीव आहे. सिंचनाखाली आलेले क्षेत्र, मिळणारी पाणीपट्टी, थकीत आणि वसूल पाणीपट्टी, वीजबिल याचा विचार केला तर सिंचनक्षेत्र वाढणे गरजेचे आहे. दुष्काळावर फुंकर घालण्याचे काम ताकारी योजना मागील १५ वर्षांपासून करीत आहे. योजना सर्व बाबतीत सक्षम आहे, मात्र ती अधिक सक्षम होण्यासाठी शेतकरी आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

उसाशिवाय अन्य पिकांची पाणीपट्टी मिळत नाही. अशा शेतकऱ्यांनी पैसे भरणे गरजेचे आहे. अजून लाभक्षेत्र वाढून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर होणे आवश्‍यक आहे. अपुरे कर्मचारी असल्याने वितरणात शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. - प्रकाश पाटील, ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com