ऊस लागवड
ऊस लागवड

सांगली जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. पावसाळ्यात सिंचन योजना सुरू होत्या. यामुळे कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्‍यांत पाणी मिळाले असल्याने यंदाच्या हंगामात ऊस लागवडीमध्ये ५ हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता आहे. - विलास जाधव, ऊस विकास अधिकारी, क्रांती कारखाना, कुंडल.

सांगली  ः जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात पाऊस चांगला झाला. यामुळे शेतकरी ऊस लागवडीसाठी पुढे आले आहेत. गत वर्षी ऊस लागवडीचे क्षेत्र ७० हजार हेक्टर होते. आता पुढील वर्षी गाळपाला जाणाऱ्या उसाचे क्षेत्र आतापर्यंत ६९ हजार ११५ हेक्‍टरवर पोचले आहे. उसाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या गाळपाला जाणाऱ्या उसाचे सुमारे ७० हजार हेक्‍टरवर क्षेत्र होते. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. जलयुक्त शिवार योजनांच्या कामांमुळे पाणीसाठा वाढला. त्यातच पावसाळ्यात पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून म्हैसाळ, टेंभू व ताकारी योजना सुरू करून दुष्काळी भागातील तलाव भरून देण्यात आले.

यामुळे जिल्ह्यातील शेतकरी ऊस पिकाची लागवड करण्यासाठी पुढे आले आहेत. जिल्ह्यात पूर्वहंगामामधील उसाची लागवड केली जात आहे. यामुळे पूर्वहंगामातील उसाचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज कारखान्यांच्या ऊस विकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा पुढील वर्षी गाळपाला जाणाऱ्या उसाच्या क्षेत्रात पाच हजार हेक्‍टरने वाढ होईल.

टेंभू, ताकारी म्हैसाळ योजना सुरू करून पावसाळ्यात पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळी भागातील तलाव भरून दिल्याने या भागात पाण्याची उपलब्धता झाली होती. यामुळे आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील शेतकरी ऊस लागवडीसाठी पुढे आले आहेत. यामुळे दुष्काळी भागात उसाचे क्षेत्रात वाढू लागले आहे. टेंभू व ताकारी उपसा सिंचन योजना वास्तविक नोव्हेंबरमध्ये सुरू होते. याच आवर्तनावर या लाभ क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी खोडवाचे नियोजन करतात. पाणी मिळत असल्याने खोडवा घेण्यासाठी शेतकरी पुढे येतात. यामुळे खोडव्याच्या क्षेत्रात वाढ होते. मात्र, या योजनांचे आवर्तन दोन महिन्यांनी उशिरा सुरू झाले. याचा परिणाम उसाच्या खोडव्याच्या क्षेत्रावर होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com