निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधार

देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे निर्यात कमी होती. मात्र सध्या सोयापेंड आयात व निर्यातीचे दर हे ४१ हजार रुपये प्रतिटनांच्या जवळपास आहेत.
Soybean price support due to export verification
Soybean price support due to export verification

पुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे निर्यात कमी होती. मात्र सध्या सोयापेंड आयात व निर्यातीचे दर हे ४१ हजार रुपये प्रतिटनांच्या जवळपास आहेत. त्यामुळे निर्यात पडतळ (पॅरिटी) निर्माण झाली असून बाजारात सोयाबीनच्या पाच हजार रुपये दराला आधार निर्माण झाला आहे. 

देशात सोयापेंडचा वापर यंदा वाढल्याचे युएसडीएसोबतच देशातील काही संस्थांनी म्हटले आहे. युएसडीएच्या मते भारतात यंदा सोयापेंडचे उत्पादन ७७ लाख टन होण्याचा अंदाज असून वापर ७० लाख टनांवर पोचण्याची शक्यता आहे. पोल्ट्री उद्योगाच्या अंदाजानुसार यंदा उद्योगातून ६१ लाख टनांपर्यंत मागणी राहील. तर उर्वरित वापर हा मस्त्य, पशुधन आणि मानवी आहारात होईल. सोपाच्या माहितीनुसार मागील हंगामात जवळपास १९ लाख टन सोयापेंड निर्यात झाली होती. 

जागतिक पातळीवरही यंदा सोयापेंड भाव खात आहे. त्यामुळे भारतात आयातही महाग होत असून देशातील दर आता आयात पडतळीवर आले आहेत. त्यातच देशात मागणी मजबूत असल्याने दर अधिक होते त्यामुळे सोयापेंड निर्यात कमी होत आहे. अर्जेंटिना, ब्राझील आणि अमेरिकेतील फ्री ऑन बोर्ड सरासरी निर्यात ऑफर मूल्य जवळपास स्थिर आहे. तर भारताच्या फ्री ऑन बोर्ड सरासरी निर्यात ऑफर मूल्यात मोठे चढउतार होताना दिसत आहे. त्यामुळे देशातील सोयापेंडचे दर हे स्पर्धात्मक नव्हते. परंतु आता दर पडतळ पातळीवर आले आहेत. त्यामुळे सोयापेंड निर्यात होण्यास अनुकूल स्थिती आहे. 

अशी झाली निर्यात यंदाच्या वर्षाचा आढावा घेतल्यास जानेवारी २०२१ मध्ये फ्री ऑन बोर्ड सरासरी निर्यात ऑफर मूल्य ५२९ डॉलर प्रतिटन होते, फेब्रुवारीत वाढून ५५३ डॉलर, मार्चमध्ये ५७९ डॉलर, एप्रिल ७८१ डॉलर, मे ८३६ डॉलर, जून महिन्यात ७८३ डॉलर जुलैत ९५० डॉलर, तर ऑगस्ट महिन्यात ११३३ डॉलर आणि सप्टेंबर महिन्यात काहीसे कमी होऊन १०६९ डॉलर प्रतिटन झाले होते. त्यामुळे एवढ्या चढ्या दराने विदेशातून मागणी नव्हती. त्यामुळे देशातून सोयापेंडची निर्यात एप्रिलमध्ये ४० टन आणि मे महिन्यात ५२ हजार टन आणि त्यानंतर कमी होऊन जुलै महिन्यात २७ हजार टनांवर आले. ऑगस्ट महिन्यात निर्यात ११ हजार टन आणि सप्टेंबरमध्ये ६ हजार टन सोयापेंडची निर्यात झाली. 

पाच हजाराचा आधार एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशात सोयाबीनचा मोठा तुटवडा होता. त्यामुळे सोयापेंडचा दरही वाढला होता. मात्र, ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत दर हे कमी होत असतानाच सोयापेंडचे दर निर्यात पडतळ पातळीपर्यंत येत होते. सध्या बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार रुपये प्रतिक्विंटल असताना आयात आणि निर्यात दर ४१ हजार रुपये प्रतिटनांच्या जवळपास आहेत. त्यामुळे दरही पडतळ पातळीवर आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com