सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक आणि द्राक्ष वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी परवाने मिळाल्याने ८० ते ९० लहान मोठ्या गाड्या देशभरात पोचवल्या आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वाहतूक करणाऱ्या ट्रकसाठी डिझेल मिळत नसल्याने गाडी मालक आणि चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून गाड्यांना डिझेल उपलब्ध करण्यासाठी शासनाने मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे.
देशात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झाल्याने संचार बंदी लागू केली आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामध्ये भाजीपाला, फळे याची वाहतूक करता येईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे द्राक्षाची वाहतूक सुरू होती. मात्र, पोलिसांकडून ही वाहतूक करणाऱ्या गाड्यांची अडवणूक केली जाऊ लागली. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसह गाडी चालक चिंतातूर झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन आणि आरटीओ यांची बैठक घेऊन शेतीमाल करणाऱ्या वाहनांना परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी परवाने घेतले आहेत. जिल्ह्यातून द्राक्षाची वाहतूक सरू झाली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात सुमारे ८० ते ९० लहान मोठे ट्रक द्राक्ष घेऊन गेले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
डिझेल मिळेना जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन वाहतूक सुरू केली. द्राक्ष घेऊन गाड्या अनेक ठिकाणी पोचल्या आहेत. काही येत्या दोन दिवसांत पोचतील. मात्र, डिझेलचा प्रश्न सुटला नाही. या गाड्यांना डिझेल मिळाले नाही तर पुढे गाड्या जाणार नाहीत. त्यामुळे सरकारने डिझेलचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी चालकांनी केली आहे.
विविध मागण्या
द्राक्ष उत्पादकांनी घाबरुन न जाता आपण आपल्या जवळचे मार्केटमध्ये परवाना घेऊन द्राक्षाची विक्री करण्यासाठी पुढे आले पाहिजे. मी दोन किलोचे पॅकिंग करुन सांगली, सातारा, आणि कोल्हापूर जिल्ह्यात द्राक्षाची विक्री करणार आहे. त्यामुळे माझ्या द्राक्षाची विक्री होईल आणि दोन पैसेही अधिक मिळतील. - मारुती चव्हाण, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पलूस, जि. सांगली.
द्राक्ष काढणी सुरू झाली आहे. परंतू त्यासाठी लागणारे पॅकिंग साहित्याचे उत्पादन बंद असल्याने पॅकिंग कसे करायचे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पॅकिंग साहित्याचे उत्पादक करणाऱ्या कंपन्या सुरू कराव्यात. - संजय बरगाले, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मालगाव, ता. मिरज.
द्राक्षाची वाहतूक सुरू झाली आहे. परंतू पंपावर डिझेल उपलब्ध करुन दिले जात नाही. त्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासन आणि शासनाने यावर मार्ग काढावा. - महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.