पाऊस
पाऊस

पावसाने दिलासा, पेरण्यांना वेग

पुणे : पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने दुष्काळाने होरपळणाऱ्या राज्याला दिलासा मिळाला आहे. पावसाच्या आगमनानंतर खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, भातपट्ट्यात लावणीच्या कामांना सुरवात झाली आहे. मात्र, मुंबईसह कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दणका दिला आहे. मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये झालेल्या पावसाने मुंबईसह अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळित झाले आहे.  मुंबई : शहर, उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा, रस्ते वाहतूक कोलमडली, तिन्ही मार्गांवरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. साचलेले पाणी आणि खड्ड्यांमुळे रस्त्यांवरील वाहतूक रडतखडत सुरू होती. रात्रभर जोर वाढल्याने उपनगरांत पाणी तुंबल्याचे चित्र पाहावयास मिळाले. खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली. सांताक्रुझ येथे २४ तासांमध्ये ३७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उपनगरात अनेक ठिकाणी ४०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे सांगण्यात आले.   पुणे : जिल्ह्याच्या पश्चिम भाग, घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी येत असल्या, तरी कोरडवाहू तालुक्यात मात्र हलक्या सरी सुरू आहेत. पाणलोट क्षेत्रातील नदी, नाले, ओढे वाहू लागल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या असून, पावसाच्या पाण्यामुळे भातखाचरे भरू लागल्याने भातरोपे तरारली आहेत. सातारा : जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कायम राहिला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर असल्याने धरणात १५.१४ टीएमसी पाणीसाठा झाला. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक असून, मंगळवारी रात्री अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू होती.  सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाअभावी गावोगावी पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. साहजिकच, टॅंकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक : शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असताना सोमवारी दुपारपासून दमदार सरींनी हजेरी लावली. जिल्ह्यात सुमारे तीन ते चार तास सर्वदूर पावसाच्या सरी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. गंगापूर धरण क्षेत्रातही पाऊस झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. भंडारा : तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे. सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी भातरोपवाटिका तयार केल्या असल्या, तरी लावणीसाठी अपेक्षित पाऊस झाला नव्हता. आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चिखलणीची कामेही सुरू झाली आहेत. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com