सोलापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस

सोलापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस
सोलापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस

सोलापूर  : जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी (ता. ३) सायंकाळी पावसाने पुन्हा सुरुवात केली. पंढरपूरसह मोहोळ, बार्शी, सांगोला, उत्तर सोलापुरात पावसाने वादळीवाऱ्यासह हजेरी लावली. या पावसामुळे पंढरपूर तालुक्‍यातील नेमतवाडी येथील काही शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. अनेक भागांत पाणी साचले. दरम्यान, शुक्रवारी (ता. ४) पावसाने मात्र काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र होते. पण दिवसभर प्रचंडा उकाडा जाणवत होता. 

गुरुवारी दिवसभर कडक ऊन जाणवत होते. पावसाचे कोणतेही वातावरण जाणवत नव्हते. पण सायंकाळी चारच्यानंतर वातावरणात चांगलाच बदल झाला. अनेक भागात अचानकपणे पावसाला सुरवात झाली. विजेच्या कडकडाटासह वादळी वारे घेतच पावसाने हजेरी लावली. या हंगामात पहिल्यांदाच पावसाने वाऱ्यासह अशा पद्धतीची हजेरी लावली. अचानकपणे सुरू झालेल्या या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.  

बार्शीमध्ये दुपारी चारच्या सुमारास वैराग, पानगाव, शेळगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. पलीकडे मोहोळ तालुक्‍यातील नरखेड, मलिकपेठ, शिरापूर भागातही झाला. तर पंढरपूर तालुक्‍यातील पेहे आणि नेमतवाडी या दोन गावांच्या सीमावर्ती भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग इतका होता की काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी पत्र्याचे शेड उचकटले. या भागातील केळीच्या बागा भुईसपाटच झाल्या. 

दुष्काळी परिस्थितीतील कडक उन्हाळ्यात अनेक संकटावर मात करून सांभाळलेल्या बागा आता बहरात असताना जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या बागांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली. याशिवाय नेमतवाडी येथील अंबाबाई मंदिरासमोरील पत्राशेडही उन्मळून पडले.

जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील दोन वृक्षही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सांगोला तालुक्‍यातील वाटंबरे, माढ्यातील कुर्डुवाडी भागातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com