पोल्ट्री व्यावसायिकांची १६५ रुपयांप्रमाणे भरपाईची मागणी

पोल्ट्री व्यावसायिकांची १६५ रुपयांप्रमाणे भरपाईची मागणी
पोल्ट्री व्यावसायिकांची १६५ रुपयांप्रमाणे भरपाईची मागणी

अमरावती  ः कोरोनाला मांसाहार कारणीभूत असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविण्यात आली. त्याच्या परिणामी पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील होत नसल्याने शासनाने याची दखल घेत पोल्ट्री उद्योगाच्या मदतीसाठी पुढे यावे, अशी मागणी अमरावती जिल्हा पोल्ट्री असोसिएशनकडून करण्यात आली आहे.  अमरावती जिल्ह्यात शेतीपूरक कुक्‍कुटपालनावर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यामुळेच जिल्ह्याचे दरदिवशी अंडी उत्पादन दहा लाखाच्या घरात आहे. सध्या मात्र कोरोना वायरस प्रादुर्भावाच्या अफवेमुळे पोल्ट्री उद्योग संक्रमणातून जात असल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे. चिकन, मटण आणि मासे खाल्ल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरविण्यात आली. त्याचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला आहे. मांसल (ब्रायलर) पक्ष्याचा उत्पादन खर्च २१० रुपये आहे. याची विक्री मात्र ४५ रुपयांना प्रति किलोप्रमाणे होत आहे. यामध्ये सरासरी १६५ रुपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिकांनी केला आहे. अंड्याचा प्रति नग उत्पादन खर्च चार रुपये ५० पैसे इतका आहे. विक्री दर दोन रुपये ७० पैसे असून प्रति नग अंड्यामागे एक रुपया ८० पैशाचे नुकसान सोसावे लागत आहे. उत्पादकता खर्चाची भरपाई देखील होत नसल्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन या व्यवसायची उभारणी केली. त्याची परतफेड कशी करावी या विवंचनेत ते आहेत. पक्ष्यांचे संगोपनही त्यांना करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे शासनाने प्रती पक्षी १६५ रुपये याप्रमाणे आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोल्ट्री असोसिएशनचे डॉ. शरद भारसाकळे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. या वेळी नितीन हुतके, अतुल पेरसपुरे, दिलीप मेटकर, गिरीश घटोळे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com