सोयाबीन नुकसानामुळे बियाणे टंचाईची शक्यता

सोयाबीन नुकसानामुळे बियाणे टंचाईची शक्यता
सोयाबीन नुकसानामुळे बियाणे टंचाईची शक्यता

अकोला  ः यंदाचा सोयाबीन हंगाम शेतकऱ्यांसाठी गेल्या काही वर्षांत सर्वाधिक नुकसानकारक ठरला. जिल्ह्यात यंदा लागवड झालेल्या एक लाख ७३ हजार हेक्टरचे परतीच्या पावसाने पूर्णतः नुकसान केले. त्याची झळ शेतकऱ्यांसोबतच बियाणे कंपन्यांना झेलावी लागली. पर्यायाने शेतकऱ्यांना पुन्हा येत्या हंगामात बियाण्याच्या नव्या संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. ही बियाणे टंचाई दूर करण्यासाठी कृषी यंत्रणांनी आत्तापासून ‘घरचे सोयाबीन बियाणे पेरा’ अशी जनजागृती सुरू केली आहे. जिल्ह्यात सुमारे पावणे दोन लाख हेक्टरपर्यंत सोयाबीनची लागवड झाली होती. जिल्ह्यात सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता सरासरी १० ते १५ क्विंटलपर्यंत गृहीत मानली जाते. या सरासरीनुसार यंदा लागवड झालेल्या १ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रातून किमान २५ लाख क्विंटल सोयाबीन उत्पादन यायला हवे होते. परंतु पीक काढणीच्या काळातच पावसाने हजेरी दिल्याने संपूर्ण क्षेत्राला फटका बसला. त्यामुळे यंदा सरासरीसुद्धा गाठली गेली नाही. यामुळे अनेकांना लागवडीचा खर्चसुद्धा निघू शकलेला नसल्याची वस्तुस्थिती आहे. ऑक्टोबरमधील पावसापूर्वी ज्यांचे पीक काढून झाले, त्या शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळालेला आहे.  जिल्ह्याचे प्रमुख पीक सोयाबीन असल्याने यावरच शेतकऱ्यांचे प्रामुख्याने अर्थकारण आहे. सोयाबीन हंगाम हातातून गेल्याने शेतकरी यंदा कमालीचा अडचणीत आलेला आहे. याचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसलेला नसून बियाणे कंपन्यांनाही अडचण तयार झाली आहे. चांगल्या दर्जाचे सोयाबीन मिळवताना यंदा कमालीची ओढाताण होण्याची शक्यता आहे.

घरचे बियाणे वापरण्यासाठी जनजागृती  सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्याने बियाणे दरवर्षी बदलण्याची आवश्‍यकता नसते. तीन ते पाच वर्षांपर्यंत हे घरचे बियाणे वापरल्या जाऊ शकते. यंदा अशी परिस्थिती तयार झाली आहे. शेतकऱ्यांनी आत्तापासून आगामी हंगामासाठी घरगुती बियाणे साठवून ठेवावे याची जनजागृती कृषी विभागाने हातात घेतली आहे. अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनात कृषी यंत्रणा जेथे-जेथे व्यासपीठ मिळेल तेथे आता घरचे सोयाबीन बियाणे पेरा असा सल्ला देत आहेत. याच महिन्यात अकोला दौऱ्यावर आलेले कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते एका घडीपत्रिका विमोचन झाले. यात घरगुती बियाणे साठवण्यापासून आगामी पेरणीपर्यंत काय काळजी घ्यावी, याबाबत सल्ला दिला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com