रब्बी हंगामात बुलडाण्यात पिकणार सेंद्रिय गहू

सेंद्रिय उत्पादक गटांच्या माध्यमातून हे वाण या वर्षी ३०० एकरांवर पेरण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील ३० सेंद्रिय उत्पादक गटांची कंपनी स्थापण्यात आलेली असून, खरिपात या गटांनी मूग, उडदाचे पीकसुद्धा घेतले आहे. - नरेंद्र नाईक, प्रकल्प संचालक, आत्मा, बुलडाणा
मागील वर्षी पेरलेला गहू असा वाढला होता.
मागील वर्षी पेरलेला गहू असा वाढला होता.

बुलडाणा ः जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात सेंद्रिय पद्धतीने सुमारे ३०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर गव्हाचे उत्पादन घेतले जाणार आहे. यादृष्टीने ‘आत्मा’ व शेतकरी गटांकडून नियोजन केले जात आहे. मागील हंगामात जिल्ह्यात सेंद्रिय उत्पादक गटांनी मिळून शंभर एकरांवर पारंपरिक वाण असलेला ‘बन्सीपाला’ हा गहू पेरला होता. शासनाने सेंद्रिय शेतीला पूरक धोरण मागील हंगामापासून राबविणे सुरू केले, तरी काही शेतकरी स्वतंत्रपणे यामध्ये काम करत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात वडी येथील वसंतराव पाटील हे अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहेत. मूग, उडीद, तूर या डाळवर्गीय पिकांसोबतच ते गव्हाचेही उत्पादन घेतात. त्यांनी जाणीवपूर्वक ‘बन्सीपाला’ या गव्हाचे वाण जोपासले व त्याचे बियाणे तयार करून शेतकऱ्यांमध्ये प्रसार केला.  गेल्या हंगामात त्यांना ‘आत्मा’ विभागाचे सहकार्य मिळाले. आत्मामार्फत या हंगामात १०० एकरांत सेंद्रिय पद्धतीने गहू पेरण्यात आला होता. या गव्हाची पेरणी टोकण पद्धतीने केली जात असून, एकरी अवघे पाच किलो बियाणे वापरले जाते. कमी पाण्यावरही हा गहू येतो. साडेचार ते पाच फुटांपर्यंत वाढ होते. शिवाय वादळ-वाऱ्यामध्ये टिकाव धरतो. शेतकऱ्यांना गेल्यावर्षी १२ ते १७ क्विंटलदरम्यान एकरी उत्पादन आले. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च एकरी तीन ते साडेतीन हजारांच्या आत राहला. या गव्हाला मागणी चांगली असून, सध्याच्या प्रचलित वाणापेक्षा दरसुद्धा अधिक मिळत असल्याचे श्री. पाटील म्हणाले. प्रतिक्रिया

कमी पाण्यावर येणारा हा गहू असून, खाण्यास चविष्ट व औषधी गुणधर्मयुक्त आहे. याची ओंबी छोटी व गच्च राहत असल्याने पाण्याने खराब होत नाही. आंतरपीक म्हणून मेथीसारखे पीकही घेता येते. आता इतरही शेतकरी त्याकडे वळत असल्याचे मोठे समाधान वाटते. - वसंत बळीराम पाटील,  सेंद्रिय उत्पादक, वडी, ता. नांदुरा, जि. बुलडाणा

रब्बीत गावातील ५० जणांचा समावेश असलेल्या शेतकरी गटाने या वाणाची लागवड केली होती. यासाठी गांडूळखत व तरल खताचाच वापर केला. २५ पासून तर ७० पर्यंत गव्हाला फुटवे आले होते. मंगरूळ इसरूळ गावात या वर्षी गटाशिवाय इतरही शेतकरी या गव्हाची लागवड करीत आहेत.  - प्रल्हाद संपत गवते, गटप्रमुख, जय किसान सेंद्रिय शेतकरी गट, मंगरूळ (इसरूळ), ता. चिखली, जि. बुलडाणा   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com