सोलापूर बाजारसमिती निवडणूकीसाठी नऊ जण अपात्र

सोलापूर बाजारसमिती
सोलापूर बाजारसमिती

सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी सभापती दिलीप माने, माजी सभापती इंदूमती अलगोंडा यांच्यासह नऊ प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाजार समितीच्या थकबाकीमुळे अपात्र ठरवण्यात आले आहेत. आता या उमेदवारांना आपल्यावरील त्रुटीबाबत जिल्हाधिकऱ्यांकडे अपिल करता येणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दिग्गज या निवडणुकीबाहेर पडल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.

सोमवारी छाननीच्या दिवशी दिवसभर अर्जांच्या आणि त्याच्या पात्रतेसाठी इच्छुकांनी काथ्याकूट केला. कोणाचे जात प्रमाणपत्र नाही, तर कोणाचा अर्ज चुकीच्या मतदारसंघात भरला गेला आहे, असे काहीसे निदर्शनास आले. बाजार समितीच्या या निवडणुकीसाठी तब्बल ३९३ अर्ज आले आहेत. त्यापैकी ३५ अर्ज अपात्र ठरले आहेत.

या सगळ्यामध्ये गैरव्यवहाराच्या आरोपामुळे गुन्हे दाखल झालेल्या माजी संचालकांच्या अर्जाकडेच सर्वांचे लक्ष लागले होते; पण शेवटी त्यांचे अर्ज अपात्र ठरलेच. तत्कालीन सभापती दिलीप माने, इंदूमती अलगोंडा, सिद्धाराम चाकोते, अशोक देवकते, अविनाश मार्तंडे, राजेंद्र गंगदे या तत्कालीन संचालकांवर पणन कायद्याच्या कलम ५७ (४) अन्वये एक सदस्यीय न्यायाधीकरणाने वसूलपात्र रक्कम निश्‍चित केली आहे, ही रक्कम भरण्यासाठी या तत्कालीन संचालकांना दोन वेळा नोटीसही बजाविण्यात आली होती. या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी हे अर्ज अपात्र केल्याचे सांगण्यात आले.

अन्य प्रमुख उमेदवारांमध्ये दिलीप माने यांचे बंधू जयकुमार माने आणि भाचे धनंजय भोसले यांच्याकडे बाजार समितीच्या अडत्याचा परवाना असल्याने त्यांचा शेतकरी मतदारसंघातील अर्ज अपात्र केल्याचे सांगण्यात आले. माजी कृषी सभापती भीमाशंकर जमादार यांच्याकडे ओबीसीचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला.

या सर्व उमेदवारांच्या विरोधात श्रीमंत बंडगर, शिरीष पाटील, हणमंत कुलकर्णी, सविता मेंडगुदले यांनी हरकती घेतल्या होत्या. आता आक्षेप असणारे किंवा अपात्र ठरवलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल करता येणार आहे. त्यानंतरच त्यांच्या अर्जाबाबत फेरविचार होऊ  शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com