सोलापूर ः जून ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ६५८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम डिसेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचा आदेश दिला आहे. १ डिसेंबर रोजी प्रारूप यादी प्रसिद्धी होईल. त्यावर ७ डिसेंबरपर्यंत तक्रारी व हरकती मागवण्यात येतील आणि १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल.
निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये विधानसभा मतदार यादीत संबंधित ग्रामपंचायतीचा समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या अधिक त्या ग्रामपंचायतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान असल्याची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत.
लेखनिकाच्या काही चुका, दुसऱ्या प्रभागातील चुकून समावेश केलेले मतदार, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही ग्रामपंचायतीच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली, तर अशा मतदारांची नावे ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादीत समाविष्ट करावी, मतदार यादीतील दुबार नावे शोधावीत, मृत अथवा स्थलांतरित असल्यास योग्य तो निर्णय घ्यावा. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या नावासह प्रसिद्धी अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करावा, असे आयोगाने आदेशात नमूद केले.
विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरा
एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या व नव्याने तयार करण्यात आलेल्या तसेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २५ सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी वापरावी, असेही आयोगाने सुचवले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.