औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत मुगाच्या शेंगांना फुटले कोंब !

औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील मुगाच्या पिकावर संकटाचे ढग गडद झाले आहेत. काही ठिकाणी काढणीला आलेल्या मुगाच्या शेंगाना कोंब फुटले, तर काही ठिकाणी शेंगा व त्यातील दाणेही काळे पडले.
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत मुगाच्या शेंगांना फुटले कोंब !
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत मुगाच्या शेंगांना फुटले कोंब !

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील मुगाच्या पिकावर संकटाचे ढग गडद झाले आहेत. काही ठिकाणी काढणीला आलेल्या मुगाच्या शेंगाना कोंब फुटले, तर काही ठिकाणी शेंगा व त्यातील दाणेही काळे पडले. त्यामुळे अनेक संकटांतून हाती येण्याची आशा असलेले मुगाचे पीक किती हाती येईल याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदाच्या खरिपात २० लाख १७ हजार ७९७ हेक्‍टरवर पेरणी झाली. या पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ६२ हजार ४९२ हेक्‍टरवर मुगाचे क्षेत्र आहे. या मुगाच्या क्षेत्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १४ हजार ३०९ हेक्‍टर, जालना २६६४१ हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यातील २१ हजार ५४२ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. औरंगाबाद व बीड जिल्ह्यांत मुगाची सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली, तर जालना जिल्ह्यात मात्र सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ६७ टक्‍के क्षेत्रावरच मुगाची पेरणी झाली होती. सुरुवातीला समाधानकारक पावसामुळे मुगाचे पीक चांगलेच बहरले. परंतु बहुतांश भागात ऐन फुलाच्या कालावधीत पावसाच्या खंड, शिवाय त्यापूर्वी कोकडा व इतर किडरोगांच्या आक्रमणाने पिकांचे कंबरडे मोडण्याचे काम केले.  प्रतिक्रिया... या संकटातून वाचून काही अंशी पीक हाती येण्याची आशा निर्माण झाली असतानाच आता चार दिवसांपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तोडणीला आलेल्या शेंगाना शेतातच कोंब फुटत असून, काही ठिकाणी शेंगा काळ्या पडल्या आहेत. त्यामुळे अनेक भागांत शेतकऱ्यांना डाळीपुरते मूग होतील की नाही याची चिंता लागली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या पिकाचा विमा उतरविला त्यांना विम्याचा परतावा मिळेल की नाही, त्याची कुणी दखल घेणार की नाही असा प्रश्‍नही शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. एक एकर मूग सुरुवातीला पावसाच्या समाधानकारक प्रमाणामुळे नजरत भरत होता. नंतर पावसाच्या खंडाचं संकट या पिकानं सोसलं. जिथं १०० टक्‍के उत्पादन हाती येण्याची आशा होती तिथे ६० टक्‍के हाती येण्याची आशा निर्माण झाली. आता त्या आशेवर लागून बसलेल्या पाण्यानं नांगर फिरविला. उभ्या पिकात शेंगांना कोंब लागत आहेत. माझीच नाही परिसरातील अनेक मूग उत्पादकांची हीच अवस्था आहे. - मिठूभाऊ चव्हाण, भांडेगाव, जि. औरंगाबाद

यंदा तीन एकरांवर मुगाचे पीक घेतले. पीक तोडणीला आले असतानाच पाऊस लागून बसल्याने शेंगासोबत दानेही काळे पडले. आधी कोकडा अन्‌ पावसाच्या खंडाने आमच्या परिसरातील ५० टक्‍के मुगाचे पीक हातचे गेले. आता लागून बसलेल्या पावसाने हाती येणाऱ्या पिकावर संकट आलंय. डाळीपुरते मूग होतात की नाही काय सांगावं. - सोमनाथ नागवे, खामखेडा, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com