लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकट

लष्करी अळीमुळे सर्व मका वाया जात आहे. आधीच दुष्काळ, चाराटंचाई आणि आता लष्करी अळीचा हल्ला यामुळे अडचणीत असलेल्या दूध व्यवसायावर आगामी काळात गंभीर संकट येत आहे. यामुळे शेतकरी पूर्णतः उद्‍ध्वस्त होणार आहे. चारा देणारी पिके जर वाया गेली, तर चारा कोठून आणायचा हा दुष्काळापेक्षाही मोठा गंभीर प्रश्‍न असेल. - गुलाबराव डेरे, नेते, कल्याणकारी दूध उत्पादक संघ, नगर
लष्करी अळी
लष्करी अळी

नगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगरसह राज्याच्या अनेक भागांतील चारा उत्पादन धोक्यात आले आहे. त्याचा गंभीर परिणाम दूध व्यवसायावर होणार असून, चाराटंचाईचे मोठे संकट निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे सरकारी पातळीवर कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि विद्यापीठ उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगत असले, तरी आतापर्यंत एकट्या नगर जिल्ह्यामध्ये ७० ते ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील मक्यावर प्रार्दुुभाव झाला  असल्याने उपाययोजनाही कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या अनेक भागांत गेल्या वर्षी दुष्काळ होता. खरिपात पिके आली नाहीत, तर रब्बीत अनेक भागांत पेरणीच झाली नाही. त्यामुळे चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता. जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या आणि उसाच्या चाऱ्यावर लाखो जनावरांची भूक भागवली गेली. त्याचा परिणाम मात्र काही प्रमाणात दूध व्यवसायावर झाला. यंदा चांगला पाऊस होईल आणि दुष्काळातून सावरू, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र यंदा परिस्थिती बदलण्याऐवजी नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. काही भागांत पुरामुळे शेती गेली, तर काही भागांत पाऊस नसल्याने पिके वाया गेली आहेत. या साऱ्या बाबीचा परिणाम दूध व्यवसायावर होताना दिसत आहे. दूध व्यवसायातील जाणकारांच्या माहितीनुसार पाच वर्षांपूर्वी राज्यात साधारण सव्वादोन ते अडीच कोटी लिटर दुधाचे उत्पादन होत होते. मात्र सततचा दुष्काळ, चारा व पाणीटंचाई, खाद्याचे वाढते दर आणि दुधाला मिळणारे कमी दर या कारणाने दीड कोटी लिटरवर दुधाचे उत्पादन आले आहे. दोन वर्षांतील दुष्काळी परिस्थितीमुळे छावण्यांतील जनावरांना पुरेसे पोषण खाद्य मिळाले नसल्याने सतत उसाचा चारा खाण्यात येत असल्याने जनावरे कुपोषित झाले असून, त्याचाही दूध व्यवसायावर परिणाम होत आहे आणि यंदा अमेरिकन लष्करी अळीने दूध संकटात भर पडली आहे. नगर जिल्ह्याचा विचार करता राज्यात उत्पादित होत असलेल्या दुधात नगर जिल्ह्यामधून वीस ते पंचवीस टक्के म्हणजे २५ लाख लिटर दूध उत्पादित होते. मका, कडवळ, घास आणि ज्वारीचा कडबा यावरच दूध व्यवसाय अवलंबून आहे. जिल्ह्यामध्ये सोळा लाख जनावरे आणि बारा लाखांच्या जवळपास शेळ्या-मेंढ्या आहेत. यानुसार दर महिन्याला साधारण दोन लाख ३५ हजार, तर वर्षाला २८ लाख ६३ हजार टन चारा लागतो. दुभत्या म्हशी- गाईंची संख्या पाच लाखांच्या पुढे आहे. जिल्ह्यामध्ये यंदा चाऱ्यासाठी ३० हजार ८८३ हेक्टर क्षेत्रावर, तर उत्पादनासाठी ७३ हजार २०८ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी केलेली आहे. मात्र यातील सुमारे ८० टक्के म्हणजे ८० ते ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर मका लष्करी अळीने बाधित झाली आहे. त्यामुळे मक्यापासून तयार होणारा सुमारे तेरा ते चौदा लाख टन चारा अडचणीत आहे. त्याचा सारा परिणाम दूध व्यवसायावर होणार असून, नगरसह राज्यापुढेच यंदाही चाऱ्याचे गंभीर संकट उभे राहू पाहत आहे. उपाययोजनाही ठरल्या कुचकामी लष्करी अळीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर कृषी विभागाने उपाययोजना करत असल्याचा दिखावा केला, मात्र प्रत्यक्षात कोणतीही उपाययोजना कामी आली नाही. प्रादुर्भाव रोखण्यात सगळ्या उपाययोजना कुचकामी ठरल्या आहेत. नुकतीच जिल्हा पशुसंवर्धन विभागाने प्रादुर्भाव झालेल्या मक्याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन मागवले होते. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार लष्करी अळीचा प्रादुर्भाव असलेल्या मक्यावर जैविक कीटकनाशकांची शिफारस आहे. रासायनिक फवारणी केल्यानंतर किमान महिनाभर जनावरांना चारा खाऊ घालू नये. मुरघासही एक महिन्यानंतर करावा, असा सल्ला दिला जात आहे. मक्याचे करायचे काय? मका आता काढणीला येऊ लागला आहे. मात्र लष्करी अळी पडल्याने तो मका बाधित झाला आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात बहुतांश शेतकरी मक्यापासून मुरघास करतात. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केलेला मका त्वरीत खाऊ घातल्यास जनावरांना विषबाधा होण्याचा धोका आहे. त्यामुळे उभ्या असलेल्या मक्याचे करायचे काय, असा प्रश्‍न हजारो शेतकऱ्यांसमोर उभा आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com