पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा सुरू असतानाच उन्हाचा चटकाही वाढत आहे. राज्याच्या अनेक भागात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. बुधवारी (ता. १) सकाळपासूनच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (गुरूवारी) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या महिन्यात २४ मार्च रोजी विदर्भातील अकोला येथे ४०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पूर्वमोसमी पावसाने विविध भागात हजेरी लावल्याने तापमानात चढ-उतार सुरू होता. मंगळवारी राज्यात उन्हाचा चटका चांगला वाढला.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे ४०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेलेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. तर सोलापूर येथे ३९.६, अकोला येथे ३९.४, जळगाव येथे ३९.० अंश सेल्सिअस, सांगली, अमरावती, वर्धा येथेही तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बुधवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.६ (१८.४), जळगाव ३९.० (२१.५), कोल्हापूर ३६.६ (२४.०), महाबळेश्वर ३०.६ (१९.७), मालेगाव ४०.४ (२०.२), नाशिक ३६.३ (१८.०), निफाड ३५.० (१५.२), सांगली ३८.० (२३.३), सातारा ३७.८ (२१.१), सोलापूर ३९.६ (२३.९), डहाणू ३२.६ (२१.५), सांताक्रूझ ३३.६ (२२.१), रत्नागिरी ३४.२ (२३.९), औरंगाबाद ३६.० (१९.४), परभणी ३७.२ (२१.४), अकोला ३९.४ (२०.९), अमरावती ३८.६ (२१.६), बुलडाणा ३४.० (२१.६), ब्रह्मपूरी ३६.९ (२२.३), चंद्रपूर ३५.० (२०.०), गोंदिया ३६.६ (२१.८), नागपूर ३७.८ (२०.०), वर्धा ३८.० (२२.०).
विदर्भात पावसाची शक्यता राज्याच्या बहुतांशी भागात पूर्वमोसमी पाऊस उघडीप देण्याची शक्यता असली, तरी उद्यापासून (ता. ३) विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उर्वरीत राज्यात मुख्यत: उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. रविवारपासून (ता. ५) विदर्भासह, मराठवाड्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.