महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ऊस वाणांचा राज्यात दबदबा

राज्यात ऊस लागवडीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ऊस वाणांची ९० टक्के क्षेत्रावर म्हणजे आठ ते नऊ लाख हेक्टरवर लागवड झालेली आहे. १९९६ मध्ये विकसित केलेल्या को ८६०३२ वाणाची लागवड असलेले क्षेत्र अधिक आहे.
Mahatma Phule Agricultural University's cane varieties prevail in the state
Mahatma Phule Agricultural University's cane varieties prevail in the state

नगर ः राज्यात ऊस लागवडीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ऊस वाणांची ९० टक्के क्षेत्रावर म्हणजे आठ ते नऊ लाख हेक्टरवर लागवड झालेली आहे. १९९६ मध्ये विकसित केलेल्या को ८६०३२ वाणाची लागवड असलेले क्षेत्र अधिक आहे. याशिवाय नव्याने विकसित झालेल्या फुले १०००१, को ९२०५ या उसाच्या वाणांखालील क्षेत्र वाढत आहे. ही माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठातून देण्यात आली.  

राज्यात उसाचे साधारण दहा लाख हेक्टर क्षेत्र आहे. सर्वसाधारणपणे नगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक भागांत उसाचे क्षेत्र अधिक आहे. अलीकडे मराठवाड्यातही उसाचे क्षेत्र वाढत आहे. २०० साखर कारखान्यांकडून राज्यात उसाचे गाळप होते. साखर कारखान्याची वार्षिक उलाढाल पंचवीस हजार कोटींपेक्षा अधिक आहे. १० ते १२ लाख ऊसतोड मजूर, १५ हजारांपेक्षा अधिक साखर कामगार उसाच्या शेतीवर अवलंबून आहे. राज्यात सातत्याने उसाच्या क्षेत्रात वाढ होत गेली. त्याला कारणही महात्मा फुले विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातून विकसित केलेल्या सुधारित ऊस वाणाचे आहे. दिवंगत डॉ. ज्ञानदेव हापसे यांचे राज्यातील ऊस क्षेत्र आणि उत्पादन वाढीत मोठे योगदान आहे. 

आतापर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधनातून उसाचे अधिक उत्पादन आणि साखर उतारा देणारे १४ वाण प्रसारित केले आहेत. मध्यम उशिरा पक्व होणारा, अधिक उत्पादन क्षमता, अधिक साखर उतारा, उत्तम खोडवा, रोग व कीड प्रतिकारक्षम, पाण्याचा ताण सहन करणारा, पूरबुडीत क्षेत्रात तग धरणारा आणि अनेक खोडवे देऊ शकणाऱ्या को ८६०३२ या १९९६ मध्ये संशोधित केलेल्या वाणाला अधिक पसंती राहिली असून, आताही याच वाणाखाली अधिक क्षेत्र आहे. 

क्षारपाड जमिनीवर लागवडीसाठी फुले २६५ या वाणाला पसंती आहे. गरजेनुसार उसाच्या प्रसारित जातींचा आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध मूलभूत बियाणे हे पायाभूत बेणेनिर्मितीसाठी देण्यात येते. आतापर्यंत विद्यापीठाने १४ उन्नत वाण व १०२ तंत्रज्ञान शिफारशी केल्या असल्याचे कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, पाडेगाव केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. भारत रासकर यांनी सांगितले.

एक लाख ३२ हजार कोटींचा अधिक फायदा  महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित ऊस वाणाची लागवड केल्याने आधी लागवड होत असलेल्या वाणांपेक्षा या वाणांमुळे उत्पादन वाढ झाली. त्याचा फायदा राज्यातील ऊस उत्पादकांना झाला. वाढीव ऊस उत्पादनातून राज्यभरातील ऊस उत्पादकांनी २५ वर्षांत साधारण १ कोटी ३२ लाख ४६८ कोटी रुपये अधिक मिळाल्याचा दावा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशातील ऊस संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या केंद्राने विकसित केलेल्या ऊस वाणांखालील महाराष्ट्रात ९० टक्के क्षेत्र आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून, महाराष्ट्र राज्य हे साखर उत्पादनात देशात अग्रेसर आहे. - डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com