milk collection
milk collection

तोटा वाढतच राहिला, मालमत्तेसह वाहने विक्रीला 

एकीकडे वाढलेला खर्च, थकीत येणेबाकी वसूल होण्यात आलेले अपयश आणि दुसरीकडे कर्जाचा वाढत चाललेला बोजा, यामुळे सोलापूर जिल्हा दूध संघाचा आर्थिक तोटा वरचेवर वाढतच गेला.

सोलापूर ः एकीकडे वाढलेला खर्च, थकीत येणेबाकी वसूल होण्यात आलेले अपयश आणि दुसरीकडे कर्जाचा वाढत चाललेला बोजा, यामुळे सोलापूर जिल्हा दूध संघाचा आर्थिक तोटा वरचेवर वाढतच गेला. २०१८-१९ मध्ये हा तोटा तब्बल साडेचार कोटीपर्यंत पोहोचला. आज त्यात आणखी काही भर पडली आहे. यावर उपाय म्हणून संघाने थेट वाशीतील (नवी मुंबई) संघाच्या मालमत्तेसह काही वाहनांच्या विक्रीचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदाही मागवल्या. पण विभागीय उपनिबंधक सहकारी संस्थेने (दुग्ध) तूर्त या निर्णयला स्थगिती दिली आहे.  संघाच्या या आर्थिक नुकसानीचा संघाच्या दैनंदिन कारभारावर मोठा परिणाम झालाच. पण गेल्या दोन वर्षांत त्याची झळ संघासह दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही बसली. विशेष म्हणजे २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये दैनंदिन दूध संकलनात २३ हजार लिटरने वाढ झाली, मात्र या वर्षात दूध विक्रीस हवा तसा दर मिळाला नाही. याच दरम्यान शासनाने वरकड खर्चामध्ये केलेली कपातही नुकसानीला कारणीभूत ठरली. या वरकडीतून संघाला जवळपास ४ कोटी ३९ लाख रुपये मिळत होते, शिवाय याच वर्षी डिझेलचे दर वाढले, या वर्षी वाहतूक खर्चावरही अतिरिक्त ८७ लाख ३३ हजार रुपये खर्च झाले.  संस्था दूध अनुदानासाठी ९६ लाख ५९ हजार रुपयांचा अतिरिक्त निधीही खर्च झाला. विजेवरील खर्च जवळपास ४८ लाख २९ हजार ५४३ रुपये इतका झाला. परिणामी, मिळणारे उत्पन्न आणि नफा याचा मेळ काही केल्या बसेना, उलट दूध संस्था, वाहतूकदरांचे बिले थकली, कर्मचाऱ्यांचे वेतनही अडले. सुमारे साडेचार कोटी रुपयांचा तोटा या वर्षात संघाला झाला. आर्थिक परिस्थिती अगदीच नाजुक झाली. तेव्हा संघाने नवी मुंबईतील वाशीची जागा, इमारत मशिनरीसह विक्रीला काढली. तसेच संघाची काही वाहनेही विकण्याचा निर्णय घेतला. पण त्याबाबत तक्रारी आल्याने शेवटी प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विभाग तथा विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी या निर्णय़ाला तूर्त स्थगिती दिली आहे.  ...म्हणून प्रशासक मंडळ  जिल्हा दूध संघाच्या या कारभारातील त्रुटी आणि ढिसाळपणा वरचेवर वाढतच गेला. शिवाय यासंबंधी झालेल्या तक्रारीवर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून सुनावणीही सुरू होती. त्यात विभागीय उपनिबंधकांनी १३ मुद्द्यांवर संघाला खुलासा विचारला होता. पण त्यात संघाने असमाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे शेवटी स्वतः शिरापूरकर यांनी तीन सदस्यीय प्रशासक मंडळ संघावर नेमले.  संघाच्या कारभारातील त्रुटी 

  • सभासद प्राथमिक दूध संस्थांकडून करारनामे करून घेतले नाहीत. 
  • कमी दिवस दूधपुरवठा करणाऱ्या संस्थांवर पोटनियमानुसार कारवाई नाही. 
  • संघाच्या वाहन विभागाच्या लॉगबुकवर प्रवासाचे कारण नमूद नाही 
  • आर्थिक पत्रके सहकार खात्याकडे सादर केली नाहीत. 
  • दूध संस्थांना दूधबिल अॅडव्हान्स देण्याबाबत धोरण नाही. 
  • दूधबिलापोटी अॅडव्हान्स देताना हिशेब विभागाने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जादा रकमा अदा केल्या. 
  • संघाच्या सेवकांच्या बदल्या, पदोन्नतीबाबत योग्य धोरण ठरवले नाही. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com