अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग उत्पादकांचे नुकसान

अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग उत्पादकांचे नुकसान
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग उत्पादकांचे नुकसान

अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम पाऊस तर कुठे सतत ढगाळ व पावसाळी वातावरण असल्याने काढणीला आलेल्या मूग पिकाचे मोठे नुकसान होत आहे. या भागात मुगाची काढणी सुरू झाली असून वातावरणातील आर्द्रतेमुळे काढलेल्या मुगाला सुकविणेही अनेकांना शक्य झालेले नाही. परिणामी, मुगाच्या दाण्यांचा रंग बदलत असून यामुळे दर्जा खालावत आहे. बाजारपेठांमध्ये या मुगाचे दर कमालीचे खालावले आहेत. सध्या कुठल्याच बाजारपेठेत शासनाने जाहीर केलेले ७०५० रुपये हमीभाव मिळणे कठीण झाले आहे. बाजारपेठेत ३८०० पासून विक्री होत असून सरासरी ४५०० रुपयांच्या आतील दर शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत. या वर्षात जूनमध्ये पाऊस सुरू झाल्याने सुरवातीलाच पेरणी केलेल्या मुगाची काढणी जोरात आहे. अशात गेल्या १५ दिवसांत सतत ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून येत असलेल्या पावसामुळे शेतीतील कामे विस्कळित झाली. सध्या मुगाच्या शेंगा तोडणीला आल्या. काही शेतकऱ्यांनी मजुरांकडून तोडणीही केली. काही ठिकाणी यंत्राच्या (हार्वेस्टर) साह्याने काढणी केली जात आहे. परंतु, मुगाच्या शेंगा ओलसर असल्याने त्यातील दाण्यांचा रंग पांढरा होत आहे. शेंगांमधील दाणे फुटूनही नुकसान झेलावे लागत आहे. काढणी केलेल्या मुगाला सुकविण्यासाठी पुरेसे उन्ह देता येत नाही. दाण्यांमधील ओलसरपणामुळे चांगल्या दिसणाऱ्या मुगाचे नुकसान होऊ लागले आहे. सध्या वातावरण टिकून असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. मूग तोडणीच्या अडचणीत वाढ यावर्षी मुगाचा हंगाम सुरवातीपासूनच अडचणीत आलेला आहे. मध्यतंरी पावसाच्या खंडामुळे शेंगा लागणीच्या काळातच फटका बसला. त्यानंतर ज्या शेंगा लागल्या त्या तोडणीला आलेल्या असताना आता सतत पावसाळी वातावरण आहे. एकाचवेळी शेंगा तोडणीची लगबगही वाढल्याने काही भागांत शेतकऱ्यांना मजुरही उपलब्ध होत नाही. अधिकची मजुरी देऊनही शेंगा तोडणीत अडचणी येत आहेत. मोठे क्षेत्र असलेले शेतकरी यंत्राचा वापर करीत असताना त्यांनाही पावसामुळे एकाच दिवसात काढणी करता येत नाही.

मुगाला हमीभाव    ७०५०
सध्याचा सरासरी दर ४५००
कमीत कमी   ३५००
जास्तीत जास्त  ५८००

आमच्या भागात (खारपाण पट्ट्यात) मूग काढणी जोरात आहे. मात्र, सततच्या पावसाळी वातावरणामुळे अडचणी आहेत. यंत्राद्वारे मूग काढायचा तर पावसामुळे दिवसभर काम होत नाही. काढलेला मूग सुकविण्यातही अडचणी आहेत. सततच्या आर्द्रतेमुळे मुगाचे दाणे पांढरे झाले आहेत. यामुळे चांगले दर मिळणे कठीण झालेले आहे. - अनुप साबळे, शेतकरी, तरोडा ता. अकोट जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com