पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाण्यात मॉन्सूनने दमदार आगमन केले आहे. शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अनेक ठिकाणी धुंवाधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सिंधुदुर्गमधील मालवण येथे उच्चांकी ४९१ मिलिमीटर, वेंगुर्ला येथे २६६ मिलिमीटर तर ठाण्यातील भिवंडी येथे २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. तर उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण किनारपट्टीवर शुक्रवारपासून पाऊस सुरू झाला असून, शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता. समुद्रही खवळला असून किनारपट्टीत दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर कमी असला तरी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. नदीनाल्यांमधून पाणी वाहू लागले असून, गोड्या पाण्यातील चढणीचे मासे मारण्यासाठी खवय्यांची लगबग सुरू झाली आहे. मुंबईसह उत्तर कोकणात ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याच्या विविध भागांत रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. मुसळधार सरी कोसळत असतानाचा मालवन, कणकवलीतील व्हिडिअो.. पुणे जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, इंदापूर, आंबेगाव तालुक्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. जोरदार पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले, तर सखल भागात पाणी साचण्याबरोबरच ओढे, नाले वाहू लागले. सातारा जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. कोरेगाव, माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांतही अनेक भागामध्ये दमदार पाऊस झाल्याने जलसंधारण झालेल्या कामात पाणी साचले होते. सोलापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. शेतशिवारात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. सांगली जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमी कमी झाला होता. नगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळ परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विमानतळाचे नुकसान झाले. संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नगर, कर्जत तालुक्यामध्ये चांगल्या पाऊस नोंद झाली. पावसाने नदी, नाले, ओढे व शेतात चांगले पाणी वाहू लागले. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली व उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्राेत हवामान विभाग) :
कोकणात जोरदार पावसाचा अंदाज कोकणात पावसाने जोर धरला असून, मंगळवारपर्यंत (ता. १२) दक्षिण कोकणात जोरदार ते अति जोरदार, उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोमवारपर्यंत (ता. ११) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.