पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे करार रद्द 

राज्यातील फळबागांसाठी असलेल्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीकविम्याच्या लाभासाठी ठरवलेल्या प्रमाणकांचे (ट्रिगर) निकष चुकीच्या पद्धतीने ठरवल्याने शेतकऱ्यांना लाभाचा बेभरवसा निर्माण झाला होता.
pomegranate
pomegranate

सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीकविम्याच्या लाभासाठी ठरवलेल्या प्रमाणकांचे (ट्रिगर) निकष चुकीच्या पद्धतीने ठरवल्याने शेतकऱ्यांना लाभाचा बेभरवसा निर्माण झाला होता. साहजिकच, या योजनेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता. शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधानंतरही कृषी विभागाने गतवर्षी ही योजना तशीच सुरू ठेवली. पण शेतकऱ्यांनी त्याला हवा तसा प्रतिसाद दिला नाही. अखेरीस तब्बल वर्षभरानंतर कृषी विभागाला जाग आली असून, या योजनेसाठी कंपन्यांशी केलेला करार रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. 

कृषी आयुक्तालयाच्या मुख्य सांख्यिकी विभागाने यासंबंधीचे पत्र राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवले असून, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन वर्षांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा करार रद्द करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच मृग आणि आंबिया बहरांसाठी सन २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधी करता नव्याने ई-निविदा मागवल्या आहेत. लवकरच यासंदर्भात नवीन शासन निर्णय जाहीर होईल. त्यानंतरच पीकविमा संकेतस्थळ खुले करण्यात येईल, असेही म्हटले आहे. 

दरम्यान, ‘अॅग्रोवन’नेही गेल्या वर्षी (११ जून २०२० च्या अंकात) यासंबंधी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने कशी गैरसोयीची आहे, हे मांडले होते. त्याशिवाय डाळिंब, द्राक्ष आधी फलोत्पादक संघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनीही स्वतंत्ररीत्या पत्र पाठवून यात दुरुस्तीची मागणी केली होती. पण त्यावर कोणताच निर्णय झाला नव्हता. विशेषतः डाळिंब उत्पादकांना त्याची सर्वाधिक झळ बसणार होती. या योजनेनुसार डाळिंबासह सर्वच फळपिकांसाठी त्या त्या फळानुसार स्वतंत्र ट्रिगर ठरवण्यात आले होते. विशेष म्हणजे हे ट्रिगर गतवर्षी केवळ एका वर्षासाठी ठरवले नव्हते. तर पुढील तीन वर्षांसाठी होते. या विमा योजनेनुसार जुलै ते ऑगस्ट या कालावधीत सलग पाच दिवस २५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला, तरच मृग बहरातील नुकसान भरपाई मिळणार होती. पूर्वी हा निकष दोन दिवसांपर्यंत होता. त्यामुळे सलगपणे असा पाऊस पडेल का आणि नुकसानभरपाई मिळेल का, याबाबत साशंकता निर्माण झाली होती.  ट्रीगरचे जाचक निकष  वास्तविक, डाळिंबासह अन्य काही फळे कमी पर्जन्यमान असलेल्या सोलापूरसह जळगाव, बुलडाणा, वाशीम, जालना यांसारख्या जिल्ह्यात घेतली जातात. या भागातील बहुतांश भाग हा कोरडवाहू आणि कमी पर्जन्यमानाचा आहे, असे असतानाही पावसाचा खंड या आधारावर निकष ठरवायला हवेत, पण पडणाऱ्या अधिकच्या पावसाच्या आधारावर ट्रीगरचे निकष ठरवले गेले, त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याला विरोध वाढला.  प्रतिक्रिया पीकविमा योजना सोपी आणि सुटसुटीत व्हायला हवी. पण सरकारच त्यात पैसे मिळविण्यासाठी असा गोंधळ घालते, असो शेतकऱ्यांच्या विरोधानंतर उशिरा का होईना, कृषी विभागाला जाग आली, हे महत्त्वाचं.  - विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी युवा आघाडी, सोलापूर  कृषी विभागाचे यासंबंधीचे पत्र आम्हाला मिळाले आहे. फळपीक विम्याबाबत लवकरच शासनाचे नवे आदेश येतील. तेव्हा त्यानुसार पीकविमा भरण्याबाबत शेतकऱ्यांनी तयारी ठेवावी.  - रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com