उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही; अकोला ४३.८ अंश

मंगळवारी (ता.१४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४३.८, तर जळगाव येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही; अकोला ४३.८ अंश
उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही; अकोला ४३.८ अंश

पुणे : एप्रिल महिना मध्यावर आला असतानाच राज्याच्या तापमानातही सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी (ता.१४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४३.८, तर जळगाव येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच तापमान ४३ अंशांपार गेले आहे. उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाचा ताप वाढला असतानाच, राज्याच्या विविध भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.१५) विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे.  राज्यात उन्हाळा चांगलाच जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेल्याने दुपारच्या वेळी बाहेर पडणेही त्रासदायक ठरत आहे. तर कोकणात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३४ अंशांच्या आसपास आहे. विदर्भ चांगलाच होरपळला असून, बहुतांशी ठिकाणी तापमान ४० ते ४४ अंशांच्या दरम्यान आहे. खानदेशात ऊन वाढले असून, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान ३८ ते ४३ अंश, तर मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांच्या असपास आहे. पुढील काळात उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे. 

दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता.१५) मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात आकाश अंशत: ढगाळ राहून उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.७, जळगाव ४३.०, धुळे ४२.०, कोल्हापूर ३७.४, महाबळेश्‍वर ३१.१, नाशिक ४०.२, निफाड ३९.०, सांगली ३८.०, सातारा ३८.६, सोलापूर ४०.९, डहाणू ३३.८, सांताक्रूझ ३४.०, रत्नागिरी ३३.४, औरंगाबाद ४०.१, बीड ४१.१, परभणी ४२.२, नांदेड ४१.५, अकोला ४३.८, अमरावती ४२.२, बुलडाणा ३८.६, ब्रह्मपुरी ४०.४, चंद्रपूर ४०.०, गोंदिया ४१.२, नागपूर ४१.२, वाशीम ४२.०, वर्धा ४१.७.  तापमान ४२ अंशापार गेलेली ठिकाणे :  अकोला ४३.८, जळगाव ४३.०, परभणी ४२.२, अमरावती ४२.२, धुळे ४२.०, वाशीम ४२.०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com