जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवर

जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवर
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवर

पुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव अक्षरश: भाजून निघाले आहे. शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापुरात पारा ३७.६ अंशांवर पोचला होता, तर नगर, मालेगाव, अकोला, अमरावतीमध्येही तापमान ३६ अंशांच्या पुढे गेल्याने ऊन असह्य झाले आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   पावसाने दडी मारल्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासूनच उन्हाची ताप वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यातही तापमानाची चढती कमान सुरू आहे. शुक्रवारी (ता. १२) जळगाव येथे तापमान ३८ अंशांवर पोचले. गेल्या दहा वर्षांच्या आॅक्टोबरमध्ये तिसऱ्यांदा जळगावमध्ये तापमान ३८ अंशांवर गेले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये १० अाणि १५ ऑक्टोबर रोजी ३८ अंश तापमानाची नोंद झाली होती. तर १४ ऑक्टोबर १९८२ रोजी सर्वकालीन उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. शुक्रवारी सोलापूरामध्ये दहा वर्षांतील ऑक्टोबर महिन्याचे उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.    बंगालच्या उपसागरामधील ‘तितली’ चक्रीवादळाची जमीनीवर आल्यानंतर निवळू लागले अाहे. ओडिशा परिसरावर तीव्र कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, ते पश्‍चिम बंगालकडे सरकत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे शुक्रवारी दुपारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अंशत: ढगाळ हवामान होते. तर अरबी समुद्रातील ‘लुबन’ अतितीव्र चक्रीवादळ पश्‍चिमेकडे सरकत आहे. रविवारी (ता. १४) दुपारपर्यंत हे वादळ रियान (येमेन) आणि अल-घैदाह (आेमान) जवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.१२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.६, नगर ३६.६, जळगाव ३८.०, कोल्हापूर ३३.९, महाबळेश्वर २८.६, मालेगाव ३६.४, नाशिक ३४.०, सातारा ३३.६, सोलापूर ३७.६, मुंबई ३३.८, अलिबाग ३२.०, रत्नागिरी ३३.०, डहाणू ३३.६, आैरंगाबाद ३५.४, परभणी ३६.४, नांदेड ३५.०, अकोला ३६.६, अमरावती ३६.६, बुलडाणा ३४.६, ब्रह्मपुरी ३२.९, चंद्रपूर ३५.२, गोंदिया ३२.७, नागपूर ३३.०, वर्धा ३३.९, यवतमाळ ३४.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com