नाशिक : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर होतात. यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची रोपे तयार करण्यासाठी उळे रोपे तयार करण्यासाठी टाकली. मात्र, सततचा पाऊस चालू राहिल्याने मोठ्या प्रमाणावर उतरलेली रोपे सडली आहेत; तर काही रोपे विरळ झाल्याने कांदा रोपांचा मोठा तुटवडा कांदा उत्पादकांना भासत आहे. त्यामुळे लागवडीसाठी अपेक्षित रोपे उपलब्ध होणार नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना चौथ्यांदा रोपे टाकण्याची वेळ आली आहे. सिन्नर, येवला, चांदवड, निफाड, कळवण, देवळा व सटाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक कांदा उत्पादक डेंगळे लागवड करून कांद्याचे बियाणे तयार करतात. मात्र, शेतकऱ्यांनी तयार करून टाकलेली रोपे खराब झाली आहेत. कांदा बियाणे टंचाई निर्माण झाली असून ८ ते ९ हजार रुपये पायलीप्रमाणे म्हणजेच जवळजवळ २ हजार रुपये किलोप्रमाणे बियाणे खरेदी करावे लागत आहे. त्यातच थोडे फार प्रमाणात उपलब्ध असलेल्या कांदा बियाणांचा दर वधारला आहे. अनेक कांदा उत्पादकांचे घरातील बियाणे संपले आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या बियाणांचे दर वाढले आहेत. उन्हाळ कांदा लागवड हंगाम एक महिना उशिरा जानेवारीअखेर पर्यंत कांदा लागवडी चालणार आहेत. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात धुईचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रोपे मोठ्या प्रमाणावर खराब होत आहेत. अवकाळी पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानीची सद्यःस्थिती
रोपे होती ती पावसाच्या तडाख्यात सापडून खराब झाली. आता १९०० किलोप्रमाणे महागाचे बियाणे घेऊन पुन्हा रोपे तयार करावे लागत आहे. कांद्याचा उत्पादनखर्च ५० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे चालू वर्षीचा उन्हाळ कांदा हंगाम अडचणीचा ठरत आहे. - ज्ञानेश्वर कांगुणे, कांदा उत्पादक, दरसवाडी, ता. चांदवड
उन्हाळ कांदा रोपे ८० ते ९० टक्के रोप पावसाने खराब झाले आहे. शेतकऱ्यांनी घरगुती तयार केलेले बियाणे संपले; परंतु आता विकत बियाणे घेऊन रोपे तयार करावी लागणार आहेत. - योगेश अडसरे, करंजी खुर्द, ता. निफाड
रोपे खराब झाल्याने लागवडी लांबणीवर गेल्या आहेत. मी ६ एकर क्षेत्रासाठी रोप तयार केले. मात्र, आता दोन एकरसुद्धा लागवड होणार नाही. - शिवाजी ढाकणे, कांदा उत्पादक, चास, ता. सिन्नर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.