अन्न प्रक्रिया उद्योगविषयक अहवाल धूळ खात पडला

राज्याच्या कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी धोरण जाहीर करून तसेच स्वतंत्र संचालनालयाच्या स्थापनेनंतरही परिणामकारक काम उभे राहिलेले नाही. अन्न प्रक्रिया उद्योगासंबंधीच्या सरकारी अहवालाकडेही दुर्लक्ष झाले आहे, अशी तक्रार उद्योग सूत्रांनी केली आहे.
Food processing industry report dusted off
Food processing industry report dusted off

पुणे ः राज्याच्या कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी धोरण जाहीर करून तसेच स्वतंत्र संचालनालयाच्या स्थापनेनंतरही परिणामकारक काम उभे राहिलेले नाही. अन्न प्रक्रिया उद्योगासंबंधीच्या सरकारी अहवालाकडेही दुर्लक्ष झाले आहे, अशी तक्रार उद्योग सूत्रांनी केली आहे. 

राज्याच्या अन्न, फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योगाकडे दुर्लक्ष झाल्याची बाब सर्वप्रथम फळे व भाजीपाला महासंघाने निदर्शनास आणली होती. त्यावर २०१७ मध्ये विधिमंडळात अॅड. रामहरी रूपनवार यांनी विधान परिषदेकडे अर्ज पाठविला. 

विनंती अर्ज समितीने त्याची दखल घेत विविध खात्याच्या साक्षी नोंदविल्या. समितीचे कार्यकारी अध्यक्ष शरद रणपिसे २०१९ यांनी याबाबत अहवाल सादर केला. मात्र, त्यातील मुख्य शिफारशी कागदावर राहिल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, तालुकास्तरासाठी फिरती प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रे असावीत, लहान शेतकऱ्यांपर्यंत योजना व यंत्रणा पोचविण्यासाठी फळे व भाजीपाला महासंघ किंवा स्वयंसेवी संघटनांना मान्यता देणे, त्यासाठी शिबिरे घेणे व कायमस्वरूपी अनुदान देणे, प्रक्रियेसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना करणे अशा महत्त्वपूर्ण शिफारशी या अहवालात आहेत. 

राज्यातील एमआयडीसीमध्ये प्रक्रिया महासंघासाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवावी, सर्व परवाने मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी, पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळात तज्ज्ञ म्हणून प्रक्रिया क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करावी, तसेच तळागाळातील शेतकऱ्यांना अन्न प्रक्रियेचे लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करावी, असेदेखील या अहवालात म्हटले आहे. 

‘‘दुर्देवाने या अहवालातील अभ्यासपूर्ण शिफारशी कागदावरच आहेत. राज्यात अन्न प्रक्रिया धोरण आहे. स्वतंत्र संचालनालय आहे. केंद्राची योजनाही गाजावाजा करून सुरू आहे. मात्र सामान्य शेतकऱ्यांना प्रक्रिया धोरणाचे लाभ मिळालेले नाहीत. भाव कोसळताच अद्यापही शेतकऱ्यांना त्यांचा माल रस्त्यावर टाकून द्यावा लागतो. सध्या ‘विकेल ते पिकेल’, ‘महाराष्ट्राचा ब्रॅंड’ अशा संकल्पनांचा गाजावाजा होत असला तरी त्यातून ठोस हाती आलेले नाही,’’ अशी कबुली पणन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

विधिमंडळ समितीचा अभ्यासपूर्ण अहवाल का धूळ खात पडला आहे, हे कळण्यास मार्ग नाही. ‘विकेल ते पिकेल’ ही मुख्यमंत्र्यांनी मांडलेली संकल्पना मोलाची आहे. मात्र अहवालातील सर्व शिफारशींची अंमलबजावणी झाली तरच ही संकल्पना प्रत्यक्षात येईल. अन्यथा, सरकारी यंत्रणा यापुढेही केवळ कागदी घोडे नाचवेल.  - बी. के. माने, अध्यक्ष, फळे व भाजीपाला प्रक्रिया महासंघ 

अन्न प्रक्रिया धोरणाची खडतर वाटचाल 

  • जिल्हास्तरावर अन्न प्रक्रिया अभियान सुरू करण्याचा निर्णय २०१३ मध्ये झाला. मात्र अभियान कागदावर राहिले. 
  • केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान २०१५ पर्यंत सुरू होते. परंतु अभियान बंद पडले. 
  • अन्न प्रक्रियेबाबत नेमके काय करायचे याविषयी गोंधळ. ऑक्टोबर २०१७ मध्ये अखेर राज्याचे अन्न प्रक्रिया धोरण जाहीर. 
  • मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना २०१७ पासून सुरू करण्यात आली. 
  • धोरण व योजना जाहीर झाली. मात्र अंमलबजावणी कोणी करायची याबाबत संभ्रम सुरू. 
  • कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापन करण्याची २०१९ मध्ये घोषणा 
  • संचालनालयाची घोषणा झाली; मात्र दोन वर्षे प्रत्यक्षात काहीच आकाराला आले नाही. 
  • कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयाची ऑगस्ट २०२१ मध्ये स्थापना. मात्र मनुष्यबळ आणि निधीची टंचाई. 
  • कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया संचालकांकडेच संचालनालयाची जबाबदारी; सर्व योजना एका छताखाली आणल्या. 
  • कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी कृतिगट स्थापन करण्याची घोषणा. मात्र, गटाची अद्याप स्थापना नाही. 
  • प्रक्रियेसाठी राज्याची स्वतंत्र योजना नाही; केंद्राच्या योजनेत निधी असला तरी प्रतिसाद नाही.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com