पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक; महामारीवर उपाय म्हणून तेंडोळीत परंपरा

८५ वर्षांपूर्वी आलेल्या महामारीवर उपाय म्हणून तत्कालीन सर्जुदास महाराजांनी बैलपोळ्यानंतर पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक देण्याचे सांगितले होते. महाराजांच्या या आदेशाचे पालन करत तेंडोळी ग्रामस्थांनी या परंपरेत सातत्य राखले आहे.
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक; महामारीवर उपाय म्हणून तेंडोळीत परंपरा
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक; महामारीवर उपाय म्हणून तेंडोळीत परंपरा

आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या महामारीवर उपाय म्हणून तत्कालीन सर्जुदास महाराजांनी बैलपोळ्यानंतर पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक देण्याचे सांगितले होते. महाराजांच्या या आदेशाचे पालन करत तेंडोळी ग्रामस्थांनी या परंपरेत सातत्य राखले आहे. या वर्षी देखील सोमवारी (ता.६) बैलपोळ्या नंतर पाच मंगळवार कोणतेही शेतीकाम गावात केले जाणार नाही.  सन-१९३६ मध्ये ब्रिटिशकाळात महामारीचे संकट कोसळले होते. तेंडोळीतील प्रत्येक घरातील एक-दोन जण मरण पावत होते. या वेळी राजस्थानमधील संत श्री सरजूदास महाराज हे १९३९ मध्ये तेंडोळी येथे आले. या वेळी ग्रामस्थांनी त्यांना महामारीमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यास सांगितले. महाराजांनी काही उपाययोजना सांगितल्या. त्या उपायांची अंमलबजावणी केल्यानंतर महाराजांनी गावातील हनुमान मूर्तीचे पूजन केले. या पूजेनंतर गावातील केवळ दोन व्यक्तींचा मृत्यू होईल. त्यानंतर  मृत्यू संख्या नियंत्रणात येईल असे ते म्हणाले होते. मात्र गावात येणारे पुढची संकट टाळायचे असेल, तर बैलपोळानंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी शेती कामे थांबावी लागतील असा उपदेश त्यांनी दिला होता. पाच मंगळवार हे व्रत करण्यास त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. आज ८५ वर्षांनंतर देखील ग्रामस्थ या उपदेशाचे अनुकरण करतात व बैल पोळ्या नंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी शेती कामे कोणीही करत नाही. या वर्षी पहिला मंगळवार ७ सप्टेंबर, दुसरा मंगळवार ४ सप्टेंबर, तिसरा मंगळवार २१, चौथा मंगळवार २८ सप्टेंबर  तर पाचवा मंगळवार ५ ऑक्टोबरला आहे. प्रतिक्रिया... माझे वय आज रोजी ९० वर्षे असून, माझ्या बालपणापासून बैल पोळा सण झाल्यावर येणारा पहिला मंगळवारपासून असे पाच मंगळवार शेती कामे बंद करण्यात येते. मी संत सर्जुदास महाराजांना मी स्वतः पाहिले असून माझ्या शेतातच संत सर्जुदास महाराजाचे समाधिस्थळ आहे.  - गणपतराव नागोसे, तेडोळी,आर्णी, यवतमाळ 

अनेक वर्षांच्या परंपरेनुसार सर्वच ग्रामस्थ पोळा सणा नंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारपासून असे पाच मंगळवार शेतीचे कुठलेच काम शेतकरी किंवा शेतमजूर करीत नाही ही श्रद्धा आज रोजी ही आमच्या तेंडोळी गावात कायम आहे. -सपना राठोड (सरपंच), ग्रामपंचायत तेंडोळी, ता. आर्णी

पोळा सणानंतर येणारे पाच मंगळवार शेतीतील कुठलेच काम होत नाही. ही संत श्री. सरजूदास महाराजावरील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. महामारीपासून ही श्रद्धा सुरू झाली ती सुरूच आहे. -परशराम राठोड (प्रगतिशील शेतकरी) रा. तेडोंळी ता. आर्णी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com