अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : बळिराजाची वाढली उमेद 

agri exhibition
agri exhibition

औरंगाबाद : मराठवाड्याच्या मातीत बारा महिने चोवीस तास चिवट संघर्ष करणारे आणि अस्मानी-सुलतानी संकटामुळे सतत चिंतेत असलेल्या बळिराजाचा चेहरा प्रसन्न होत आहे, याला निमित्त ठरतेय ते ‘अॅग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन..! येथे भरलेल्या या प्रदर्शनाला शनिवारी (ता. २८) दुसऱ्या दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला. देशविदेशातील नामवंत कृषी कंपन्यांची उत्पादने, आधुनिक अवजारे, तंत्रज्ञान व शेतीविषयक माहितीचा खजिना एकाच ठिकाणी सापडल्याचे समाधान गेल्या दोन दिवसांत हजारो शेतकऱ्यांना प्राप्त झालेच; पण एक नवी उमेद आणि शेतीत लढण्याची जिद्द त्यांना मिळते आहे. 

औरंगाबादच्या जबिंदा ग्राउंडवर ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनरूपी ज्ञानजागरात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा भरभरून सहभाग दिसतो आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, महाविद्यालयीन तरुण तसेच शेती कुटुंबातून आलेले चाकरमानी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेटी देत आहेत. शेतीमधील वेळ, खर्च आणि श्रमाची बचत करीत उत्पन्नवाढीच्या नव्या वाटा दाखविण्याचे ध्येय ‘अग्रोवन’च्या या उपक्रमाचे आहे. 

प्रगतशील शेतकरी बंधूंची लागलेली चारचाकी वाहने, दूरदूरच्या जिल्ह्यांमधून प्रदर्शन बघण्यासाठी खासगी वाहने करून आलेले शेतकरी, बचत गट, शेतकरी सहलींची झालेली गर्दी जबिंदा मैदानावर उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराजवळ दिसते. प्रवेश करण्यापूर्वीच शेतकरी बंधू सोडत पेटीत आपले नोंदणी क्रमांक टाकण्यासाठी गर्दी करतात. प्रवेशद्वाराजवळील कारंजा, उसाच्या फडाची रांग, बाजूला लावलेली बैलगाडी चटकन लक्ष वेधून घेते. अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाचा प्रत्यक्ष पहा video... प्रदर्शनाच्या ठिकाणी संबळ आणि खंजिरीच्या तालावर गोंधळ्यांचा पथक शेतकऱ्यांचे जंगी स्वागत करतो. खंजिरीवर पडणारी थाप शेतकऱ्याला थेट आपल्या घरासमोर उभारलेला देवमांडव आणि गोंधळ जागरण कार्यक्रमाची आठवण करून देतात. कृषी प्रदर्शनातदेखील अग्रोवनकडून चार भव्य डोम उभारले गेले असून, त्यात शेकडो स्टॉल्स आहेत. अतिशय देखणी समावट प्रदर्शनस्थळाची असून, मोकळ्या मैदानात मांडलेली अवजारे, यंत्रे, आधुनिक शेती सामग्री शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. 

युवक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती यांत्रिकीकरणाच्या स्टॉल्सकडे येताना दिसतात. मजूरटंचाईमुळे हैराण झालेला शेतकरी कमी खर्चात कमी मेहनतीत जादा फायदा मिळविण्यासाठी आधुनिक शेती अवजारांची कशी बारकाईने माहिती घेतो आहे, हे या ठिकाणी दिसून येते. शेतकऱ्यांना उच्च शेती तंत्रज्ञान अगदी माफक दरात कसे उपलब्ध होईल, या अवजारे-यंत्रे-आधुनिक शेती सामग्रीवर अर्थसह्य किंवा अनुदानदेखील कसे मिळवता येईल, याचे मार्गदर्शन करणारे विविध स्टॉल्स हेदेखील या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. 

उद्योजकीय तंत्रज्ञान लक्षवेधी  पूर्वा केमिकल्स परिवाराने साकारलेले आदर्श सेवरगाव, मधमाशी उद्यान हे या प्रदर्शनाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणायला हवे. तेथे सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांची वर्दळ असते. कृषी विभागाच्या बचत गटांकडून उभारल्या गेलेल्या विविध स्टॉल्सवरील दर्जेदार शेती उत्पादनाची माहिती घेताना शेतकरी हरवून जातात. पशुखाद्यनिर्मिती, कडधान्य प्रक्रिया, पेरणीयंत्रे, दूध काढणी यंत्रे, तेल काढणी यंत्रे शेतकऱ्यांसाठी उत्सुकतेची ठरली आहेत. याशिवाय स्प्रेअर्स, डस्टर्स आणि मशागतीच्या स्वयंचलित यंत्रांची माहिती घेत यंत्रखरेदीला देखील शेतकरी प्राधान्य देत होते. खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक स्टॉल्सवर बक्षिसांची लयलूट सुरू होती. 

चर्चासत्राची मेजवानी  अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या उच्च क्षमतेच्या रोपे व बियाण्यांची शेतकरी बाधवांकडून बारकाईने माहिती घेतली जात होती. मराठवाड्यात गटशेतीची चळवळ रुजविणारे शास्त्रज्ञ भगवानराव कापसे विविध गटांतील कोरडवाहू शेतकरी बांधवांना स्वतः या प्रदर्शनाची माहिती देत होते. तंत्रज्ञान, आधुनिक व प्रयोगशील शेतीची माहिती देणाऱ्या परिसंवादांना पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात भगवानराव कापसे यांनी गटशेतीतून कशी समृध्दी मिळवाल तर गीताराम कदम यांनी शेतमाल प्रक्रिया उद्योगाची उभारणी कशी कराल, याचा मंत्र सांगितल्याने शेतकरी खूष झाले होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com