गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले शासनाच्या मदतीकडे

नुकसानग्रस्तांचे डोळे लागले शासनाच्या मदतीकडे
नुकसानग्रस्तांचे डोळे लागले शासनाच्या मदतीकडे

सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत रब्बी हंगामातही कायम आहेत. सोमवारी (ता. २४) झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्याची दखल घेत भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.  खरीप हंगामात संततधार पावसाने पिच्छाच पुरविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना धानाची अपेक्षित उत्पादकता मिळाली नाही. रब्बी हंगामातील पिकाच्या माध्यमातून या नुकसानीची भरपाई होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, सोमवारी (ता. २४) झालेला वादळीवारा, पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे हे स्वप्न देखील धुळीस मिळाले आहे. पिपरी, चिखली, बकी, मेंडकी, कोसमघाट, मनेरी या गावांमध्ये गारांसह पाऊस झाला. काही गावांत घरावरील कवेले फुटले. गारपिटीचा सर्वाधिक फटका सौंदळ व पळसगाव शिवाराला बसला. या परिसरात भाजीपाला उत्पादकांची संख्या अधिक आहे. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी टरबूजही लावले होते. केळी उत्पादनही या भागात होते. अशा व्यावसायिक आणि नगदी पिकांनाच गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सडक अर्जुनी तहसीलदार उषा चौधरी, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांचे स्वीय साहाय्यक मिथुन मेश्राम, कृषी साहाय्यक एम. डी. कठाणे, अपूर्णा गहाने, संजय कुंभलकर यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देत पाहणी केली. राका, पिपरी, कोसमघाट, मनेरी शिवारात ३५१ हेक्‍टर तर बकी, मेंडकी, चिखली शिवारात ७० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे.  

माझी राकाजवळ नदी किनारी सात एकर शेती असून त्यात टरबूज लागवड केली आहे. साडेचार लाख रुपयांचा खर्च त्यावर झाला. पीक काढणीला काही दिवसाचा कालावधी असताना गारपिटीमुळे होत्याचे नव्हते झाले. अंदाजे बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  - चोपराम कापगते, प्रयोगशील शेतकरी, सिंदीपार

माझ्याकडे अडीच एकर शेती असून त्यात पोपट वालाची, हरभरा आदींची लागवड केली होती. परंतु, गारपिटीमुळे हे शिवारच उद्‌ध्वस्त झाले. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.  - अविनाश इरले, शेतकरी, राका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com