कृषिसेवक भरती घोटाळ्याचे धागेदोरेदेखील डेरेंपर्यंत

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगनमताने कृषिसेवक पदाच्या परीक्षेत महाघोटाळा करीत ५५ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सूत्रधाराचे नाव पोलिसांनी अद्यापही उघड केलेले नाही.
Even the threads of the Krishisevak recruitment scam are still there
Even the threads of the Krishisevak recruitment scam are still there

पुणे ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगनमताने कृषिसेवक पदाच्या परीक्षेत महाघोटाळा करीत ५५ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सूत्रधाराचे नाव पोलिसांनी अद्यापही उघड केलेले नाही. ‘‘चार वर्षांपूर्वी झालेल्या कृषिसेवक परीक्षेत प्रति उमेदवार १२ लाखांचे भाव फुटले होते. या घोटाळ्याचे धागेदोरे परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुकदेव डेरे यांच्यापर्यंत जात आहेत. मात्र पोलिस व कृषी खात्यातून त्यांना अभय मिळाल्याने या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

२०१७ मध्ये कृषिसेवकपदाच्या परीक्षांमध्ये राज्यस्तरीय घोटाळा झाला होता. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. मात्र कृषी खाते, पोलिस आणि परीक्षा परिषद यांनी एकत्र येत हा घोटाळा दाबला. या प्रकरणाचा खरा सूत्रधार का सापडत नाही, अशी विचारणा कधीही कृषी मंत्रालय किंवा कृषी आयुक्तालयाने केलेली नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल झालेल्या या प्रकरणात अद्यापही कोणाला अटक झालेली नाही. तीच संधी साधून घोटाळेबाज डेरे कंपूने पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा तपासदेखील बंद पाडला. 

कृषिसेवकपदाच्या ७३० जागांसाठी ६५ हजार अर्ज आले होते. विश्‍वासार्हता गमावलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्याची युक्तीही कृषी अधिकाऱ्यांनीच दिली होती. कारण आयुक्तालयातील आस्थापना विभागाचा एक बडा अधिकारी डेरे यांच्या सतत संपर्कात होता. भरतीत लाखोंचे भाव फुटल्यानंतर परीक्षादेखील संशयास्पदरीत्या घेतली गेली. ५५ हजार उमेदवारांनी दिलेल्या या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर घोटाळ्याला पाय फुटले. कृषी आयुक्तालयाच्या आस्थापना विभागाने सुरुवातीला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ‘अॅग्रोवन’ने पुराव्यानिशी गंभीर बाबी उघड केल्या. त्यामुळे राज्य सरकारला ही भरती रद्द करावी लागली होती. 

‘‘कृषिसेवक परीक्षा घोटाळ्याची चौकशी झाल्यास परीक्षा परिषदेकडून आपली नावे उघड केली जातील, अशी भीती कृषी खात्यातील कंपुला होती. त्यामुळे आधी परीक्षा पद्धतीचे समर्थन करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांना अचानक त्यात गलथानपणा दिसला. कृषी खात्याने स्वतःहून घोटाळ्याबाबत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला. अर्थात, गुन्हा दाखल करून हे प्रकरण थंड करण्यात कृषी खाते यशस्वी झाले होते. त्यामुळे परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त डेरेदेखील सहीसलामत निवृत्त झाले,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) झालेल्या गैरव्यवहाराबाबत पोलिसांनी या आठवड्यात परीक्षा परिषदेचे विद्यमान आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह डेरेंच्याही मुसक्या आवळल्या आहेत. ‘‘डेरेंच्या कृष्णकृत्याला कृषी व पोलिस खात्यातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते मोकाट होते. आतादेखील पोलिसांमधील एक लॉबी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होती. तथापि, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या धडाकेबाज तपासामुळे डेरे गजाआड होऊ शकले. नवटके यांनी अजून बारकाईने तपास केल्यास कोट्यवधीची उलाढाल झालेल्या कृषिसेवक भरती घोटाळाही बाहेर येऊ शकतो. परीक्षा परिषद, डेरे आणि कृषी खात्याचा आस्थापना विभाग यांच्यात असलेले साटेलोटे बाहेर येऊ शकते,’’ अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

घोटाळ्याच्या फाइल्स पडून  ‘‘कृषिसेवक परीक्षेतील घोटाळा गंभीर स्वरूपाचा होता. भारतीय दंड विधानाच्या ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१(३४) अन्वये थेट राज्य परीक्षा परिषदेवर गुन्हा दाखल केला गेला. मात्र सखोल तपास व अटक टाळली गेली. डेरे यांच्या गैरव्यवहाराकडे परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष दिनकर पाटील, कृषी आयुक्त, कृषी सचिव, शिक्षणमंत्री आणि कृषिमंत्र्यानेही दुर्लक्ष केले. त्यामुळे डेरे साळसुदपणे निवृत्त झाले आहे. या गैरव्यवहाराच्या फाइल्स आजही कृषी आयुक्तालय, परीक्षा परिषद व बंडगार्डन पोलिस ठाण्यात पडून आहे,’’ अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com