राज्यात १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट 

साखर कारखान्यांनी नवे इथेनॉल प्रकल्प उभारणी तसेच इथेनॉल निर्मिती ८३ टक्क्यांनी वाढवून १०८ कोटी लिटरवर नेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अर्थात, यंदा नवे केवळ दोन प्रकल्प सुरू होण्याची चिन्हे आहेत.
ethanol
ethanol

पुणे: राज्यात यंदा जास्त ऊस उत्पादनाची शक्यता असल्यामुळे धास्तावलेल्या साखर कारखान्यांनी नवे इथेनॉल प्रकल्प उभारणी तसेच इथेनॉल निर्मिती ८३ टक्क्यांनी वाढवून १०८ कोटी लिटरवर नेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अर्थात, यंदा नवे केवळ दोन प्रकल्प सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

नव्या इथेनॉल प्रकल्पांमध्ये स्वराज शुगर (फलटण) व जयवंत शुगर (कराड) यांचा समावेश आहे. यातून तीन कोटी लिटर उत्पादन होण्याची शक्यता आहे. 

गेल्या हंगामात राज्यात ऊस कमी होता. त्यामुळे कारखान्यांचे लक्ष साखर निर्मितीवर होते. तेल विपणन कंपन्या इथेनॉल विकत घेतात. त्यांच्याकडून मिळणारा दर अपेक्षित नव्हता. त्यामुळे कारखान्यांना इथेनॉलमध्ये स्वारस्य नसल्याने निर्मितीत केवळ १८ कोटी लिटर झाली होती. चालू हंगामात चित्र उलटे झाले असून साखर निर्मिती घटविण्याचे उद्दिष्ट प्रथमच कारखान्यांनी ठेवले आहे. 

‘‘ऊस गाळप तयार करण्यासाठी यंदा १९९ साखर कारखान्यांनी अर्ज केले आहेत. मात्र, इथेनॉल निर्मितीची क्षमता केवळ ७२ कारखान्यांकडे आहे. ही क्षमता १४७ कोटी लिटर्स इतकी असली तरी विविध कारणांमुळे गेल्या हंगामातील इथेनॉल निर्मिती नगण्य होती. यंदा मात्र उत्पादन १०८ कोटी लिटर्सपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे,’’ अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

राज्यात साखर कारखान्यांची संख्या २०० पेक्षा जास्त असली तरी इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणी अथवा विस्तारीकरणात काही कारखान्यांना अडचणी आहेत. केंद्र सरकारच्या व्याज अनुदान योजनेत १३३ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच सर्व ठिकाणी इथेनॉल निर्मिती शक्य नसल्याचे दिसते आहे. नव्या प्रकल्पांची उभारणी देखील किचकट व वेळखाऊ असते. यात एक-दोन वर्षांचा कालावधी जातो. त्यामुळे नवे किंवा विस्तारित प्रकल्प लगेचच उत्पादनात भर घालतील, अशी अपेक्षा ठेवता येणार नाही, असे सहकार विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  बॉयलरमुळे २५ कोटीचा भुर्दंड  इथेनॉलचा नवा प्रकल्प उभारण्यासाठी साखर कारखान्यांना किमान ६० कोटी रुपये गुंतवावे लागतात. त्यात पुन्हा शासनाने या प्रकल्पात भस्मीकरण व बाष्पक प्रक्रियेसाठी स्वतंत्र ‘इन्सिनिरेशन बॉयलर’ उभारणे सक्तीचे करण्यात आले आहे. परिणामी वाढीव २५ कोटींपेक्षा जास्त खर्च कारखान्यांना करावा लागत आहे.  प्रतिक्रिया साखर संघाने इथेनॉल प्रचारार्थ यंदा राज्यभर पाच मेळावे घेतले. चालू हंगामात भरपूर ऊस आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेचे संकट टाळण्यासाठी आम्हाला कोणत्याही स्थितीत साखर उत्पादन घटवायचे आहे. त्यामुळे सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रातील साखर कारखान्यांनी यंदा इथेनॉल निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे.  - जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ 

बी-हेव्ही मोलॅसिसपासून तसेच शुगर सिरप (शर्करा पाक) माध्यमातून राज्यातील साखर कारखान्यांनी यंदा जास्तीत जास्त इथेनॉल उत्पादन वाढवावे. या प्रक्रियेमध्ये साखर उत्पादन आठ टक्के कमी होते. इथेनॉल उत्पादन वाढून त्या विक्रीपोटी यंदा साखर कारखान्यांच्या हाती दर १५ दिवसाला पैसा येईल. त्यामुळे एफआरपीचे वाटप करण्यासाठी कारखान्यांना हातभार लागणार आहे.  - संजयकुमार भोसले, साखर सहसंचालक (उपपदार्थ विभाग), साखर आयुक्तालय   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com