हेमंत देशमुख यांना कापूस यंदा ठरले नुकसानीचे पीक

हेमंत देशमुख यांना कापूस यंदा ठरले नुकसानीचे पीक

अकोला ः या हंगामात बोंड अळीचा परिणाम इतका भीषण झाला, की असंख्य शेतकऱ्यांनी उभे पीक नांगरले. अनेकांना मशागतीचा खर्चही मिळू शकलेला नाही. काही शेतकऱ्यांना लागवड खर्च निघाला; मात्र या पिकाने पुरती निराशा केली. मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे प्रयोगशील तथा संपूर्ण अाॅटोमायजेशन पद्धतीने शेती करणारे शेतकरी हेमंत देशमुख यांनी चार एकरात लागवड केलेल्या कपाशीवर नुकताच ट्रॅक्टर फिरवला अाहे. त्यांना एकरी अवघी सव्वाचार क्विंटल उत्पादकता अाली असून, खर्च वजा जाता नाममात्र पैसे हातात उरले अाहेत. श्री. देशमुख हे अाधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी म्हणून अोळखले जातात. त्यांनी चार एकरांत बीटी कपाशीची लागवड २८ जूनला केली होती. दरवर्षी त्यांना किमान एकरी १७ क्विंटलपेक्षा अधिक कापूस व्हायचे. याही वर्षी सुरवातीच्या काळात पीक चांगले असल्याने एवढीच खात्री होती. परंतु बोंड अळीचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत गेला अाणि संपूर्ण पीक अळीने फस्त केले. झाडांवर बोंड्या दिसूनही त्यातून कापूस निघत नव्हता. वेचाई करायला मजूर नाकारत होते इतके हे काम किचकट झाले होते. वेचाई अाठ रुपये किलाे दराने त्यांनी चुकविली. पीक येण्याची कुठलीही शक्यता दिसत नसल्याने देशमुख यांनी गेल्या अाठवड्यात चारही एकरांत ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केले.  इतका वाईट अनुभव पहिल्यांदा अाल्याचे ते म्हणाले. उच्चशिक्षित असलेले देशमुख यांनी वेळच्या वेळी अाधुनिक पद्धतीने खत नियोजन, कीडनाशकांची फवारणी घेतली. परंतु पिकाची अवस्था हाताबाहेर गेली अाणि पीक काढण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता असे त्यांनी सांगितले. चार एकर कापूस पिकाचा ताळेबंद खर्च :   

 शेत तयार करणे  ४५००
 बियाणे       ४८००
 लागवड मजुरी  २०००
 डवरणी  २०००
 रासायनिक खते  १५०००
 फवारणी  १००००
 निंदण  ५०००
 वेचाई     (८ रुपये प्रतिकिलो)  १२८०० 
 ठिबक मजुरी  १०००
 शेवटची नांगरटी    २०००
 एकूण खर्च     ५९,१००

  उत्पन्न :   

कापूस उत्पादन १६ क्विंटल १५ किलो
मिळालेला भाव ४४०० रुपये क्विंटल
एकूण उत्पन्न  ७१०६० रुपये

  राहिलेली शिल्लक रक्कम

एकूण खर्च      ५९,१००
एकूण उत्पन्न    ७१०६०
खर्चवजा जाता शिल्लक  ११९६०
एकरी शिल्लक २९९०

(टीप ः खर्चामध्ये वैयक्तिक पीक निगराणी आणि जमिनीचे भाडे धरले नाही.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com