'महाकॉट'ची आठ लाख गाठींची निर्यात

महाकॉटच्या कापसाला मागील हंगामात चांगली मागणी राहिली. गाठीमागे ५०० रुपये जादा दरही मिळला. या हंगामातही सकारात्मक चित्र असून, खानदेशी कापसाला चांगले दर राहतील, अशी अपेक्षा आहे. - प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशन, जळगाव
कापूस गाठी
कापूस गाठी

जळगाव : गेल्या कापूस हंगामात ऑक्‍टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत खानदेशातील जिनर्सनी विकसित केलेल्या महाकॉट ब्रँडच्या कापूस गाठींना (१७० किलो रुईची एक गाठ) बाजारातील दरांपेक्षा ५०० रुपये जादा दर मिळाला. प्रमाणित दर्जा असल्याने तीन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या कापसाला पसंती दिली व जवळपास आठ लाख गाठींची परदेशात निर्यातही झाली.  खानदेशसह बुलडाणा जिल्ह्यातील ८५ जिनर्सनी महाकॉट ब्रँडअंतर्गत २१ लाख गाठींची निर्मिती केली. त्याचा दर्जा आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार ठेवला. त्यामुळे गाठीतील आर्द्रता (ह्युमिडीटी) नऊ टक्‍क्‍यांपर्यंत, लांबी २९ मिलिमीटरपेक्षा अधिक व गाठीतील कचऱ्याचे प्रमाण (ट्रॅश) तीन टक्‍क्‍यांखाली ठेवले. दर्जा कायम राखल्याने निर्यातीला वाव मिळाला. तीन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या महाकॉटच्या गाठींना प्राधान्य अधिक दिले. एकट्या बांगलादेशात दोन लाख गाठींची निर्यात झाली. याशिवाय पाकिस्तान, व्हीएतनाम, इंडोनेशिया येथूनही मागणी कायम राहिली.  ८५ जिनिंग मागील हंगामात कार्यरत होत्या. त्यातील ६० जिनिंग जळगाव जिल्ह्यात सुरू होत्या. तर उर्वरित जिनिंग धुळे, नंदूरबार व बुलडाणा जिल्ह्यात महाकॉटसंबंधी काम करीत होत्या. रुईच्या खंडीला (एक खंडी ३५६ किलो रुईची) सरासरी ४२ हजार रुपये दर मिळाला. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये दर कमी होते. मार्चमध्ये दरात थोडी सुधारणा झाली होती, असे खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.  सिंगापूरच्या कंपनीची पसंती मागील महिन्यात खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएनच्या सदस्यांनी सिंगापूर येथे कापूस कमोडिटीमध्ये कार्यरत ओलन, लुईस ड्रेफस (एलडी) या कंपन्यांच्या आशिया विभागाच्या कार्यालयांना भेट दिली. असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, सदस्य जीवन बयस, लक्ष्मण पाटील, सुरेश चौधरी आदींनी भेट दिली.

तेथे खानदेशी कापूस, लागवड व गाठींच्या निर्मितीचे तंत्रज्ञान, दर्जा यावर सादरीकरण केले. त्याची या कंपन्यांनी प्रशंसा केली व खानदेशी कापूस गाठींना पसंती देऊ, असे आश्‍वासन दिले. लागलीच ओलन कंपनीच्या प्रतिनिधींनी खानदेशी जिनर्ससोबत मागील पंधरवड्यात औरंगाबाद येथे बैठक घेतली. खानदेशी गाठींना आपण प्राधान्य देऊ, दर्जा चांगला असून, अधिक पुरवठ्याच्या दृष्टीने नवीन हंगामातही तयारी करा, असे त्या प्रतिनिधींनी खानदेशी जिनर्सना या बैठकीत सांगितल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com