कोल्हापूर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि खरीप हंगामाच्या तयारीच्या दडपणाखाली कृषी विभाग आला आहे. आतापर्यंत विभागाच्या साडेपाचशे कर्मचाऱ्यांना कोरानाने गाठले असून साठहून अधिक कर्मचारी बळी पडले आहेत. संसर्गाचा धसका फिल्डवरील कर्मचाऱ्यांना अधिक असल्याने या कर्मचाऱ्यांत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. एकीकडे जीव वाचविण्यासाठी धडपड, तर दुसरीकडे वरिष्ठ पातळीवरून पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा घेण्याचा दबाव वाढत असल्याने कर्मचाऱ्यांपुढे अडचणी वाढल्या आहेत.
सध्या खरीप हंगामाची तयारी वेगात सुरू आहे. जिल्हावार आढावा बैठका सुरू असून, त्यातून पीक प्रात्यक्षिके, हुमणी नियंत्रण कार्यक्रम, बीज प्रक्रियेसारख्या शेतकऱ्यांचा सहभाग असणाऱ्या उपक्रम राबविण्याबाबत सक्ती केली जात आहे. हे उपक्रम राबविताना शेतकरी एकत्र होणे क्रमप्राप्त असल्याने ही प्रात्यक्षिके सुरक्षित अंतर ठेवून घ्यायची कशी, असा सवाल कृषी कर्मचाऱ्यांचा आहे. सध्या राज्यात ११ हजार कृषी सहायक, ४ हजार कृषी पर्यवेक्षक तसेच १२०० मंडल कृषी अधिकारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून धोका पत्करून कृषी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. वरिष्ठ पातळीवरून लक्ष्यांक दिले असल्याने कोणत्याही परिस्थितीत अक्षांश रेखांशाची नोंदणी करून ही प्रात्यक्षिके घ्यावीच लागत आहेत.
शेती शाळा घ्यायच्या कशा? कृषी विभागाने शेती शाळा पंधरा मेनंतर घ्याव्यात, अशा आदेश काढला आहे. यामुळे फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे अडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना एकत्रित करण्याचे मोठे आव्हान कर्मचाऱ्यांपुढे आहे. सध्या बहुतांशी ग्रामीण भागात कडक लॉकडाउन आहे. ग्रामीण भागातही कोरोना झपाट्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांना एकत्रित करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे. यासाठी स्थानिक प्रशासन परवानगी देईल का? तसेच धोका पत्करून शेतकरी शेतीशाळांमध्ये जमतील का, असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे उभे ठाकले आहेत. अजूनही रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे लॉकडाउन तातडीने मागे घेण्याची शक्यता ही धूसर असल्याने या शाळा कशा घ्याव्यात याबाबत प्रश्न चिन्ह आहे.
ऑनलाइन कामाच्या नियोजनाची मागणी सध्या बहुतांशी ठिकाणी कामकाजात ऑनलाइन पद्धती वापरण्यात येत आहेत. याचा प्रभावी वापर राज्यभर करण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित करणे शक्य आहे. मात्र याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखल्यास किमान माहिती तरी शेतकऱ्यांना मिळू शकेल, असा मतप्रवाह कृषी विभागाच्या काही कर्मचाऱ्यांचा आहे. खरीप नियोजन बैठकांमध्ये लॅपटॉपसह अन्य सुविधा कर्मचाऱ्यांना दिल्यास संसर्गातून होणारा धोका टळू शकतो. यासाठी अभिनव व प्रभावी ठरतील अशा कल्पना राबवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येण्यासाठी प्रयत्न झाल्यास आमचा जिवावरचा धोका टळू शकेल, असे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.