शेतकरी सन्मान योजनेतील तक्रारीही बेदखल

राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यास आम्हाला विलंब होत आहे. - राजेश भुयार, सहायक निबंधक
कर्जमाफी
कर्जमाफी

अमरावती ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू करून कर्जमुक्‍तीची मोहीम राबविण्यात आली होती. परंतु, चांदूरबाजार तालुक्‍यातील कित्येक शेतकऱ्यांची यातून कर्जमुक्‍ती न झाल्याने त्यांनी तक्रार निवारण समितीकडे धाव घेतली आहे.  चांदूरबाजार तालुक्‍यात १५ हजार ७६५ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून १० हजार २९४ कर्जदार शेतकऱ्यांना विविध कारणांनी कर्जमाफी नाकारण्यात आली आहे. तथापि, शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये येणाऱ्या अडचणींसाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. या संबंधित असणाऱ्या तक्रारी शेतकऱ्यांना सहायक निबंधक कार्यालयाकडे कराव्या, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे या समितीकडे अद्यापपर्यंत ७१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात मंजूर असलेले २९, नामंजूर असलेले २४ व मंजूर आणि नामंजूर अशा दोन्ही याद्यांमध्ये नसलेले तसेच कार्यक्षेत्राबाहेर म्हणजेच दुसऱ्या तालुक्‍यातील पाच असे तक्रार अर्ज सहायक निबंधक कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत.  तक्रार समितीकडे मंजूर व नामंजूर अशा दोन्ही यादीत नसलेल्या १३ तक्रारी प्राप्त झाल्या असून या संदर्भात समितीने वरिष्ठ स्तरावर व संबंधित बॅंकेला कळविले आहे. यातील पहिला पत्रव्यवहार हा एक ऑगस्ट रोजी करण्यात आला. तरीसुध्दा या तक्रारींचे काय झाले? याची माहिती संबंधितांना मिळाली नसल्याने या तक्रारींचे नेमके निवारण कधी व कसे होणार ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. बॅंकांकडून तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. परिणामी, प्रकरणांचा निपटारा करण्याची समस्या निबंधकांना भेडसावत आहे. तालुक्‍यातील एका शेतकऱ्याला बॅंकेच्या चुकीमुळे कर्जमाफी नाकारण्यात आली. त्यालादेखील आतापर्यंत तक्रार करून न्याय मिळालेला नाही. खरीप हंगाम अर्ध्यापेक्षा जास्त संपत आला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.  तक्रार निवारण समितीकडून न्याय मिळण्याची त्यांना अपेक्षा होती. परंतु, तेथे देखील प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com