नगर जिल्ह्यातील फलोत्पादकांना ४९ कोटी ३६ लाखांची मदत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः दुष्काळाच्या तीव्रतेमुळे पाणी नसल्याने नुकसान झालेल्या फळबागांना शासनाने प्रत्येकी अठरा हजार रुपये प्रती हेक्टरनुसार मदत दिली आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार ४२४ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना ४९ कोटी ३६ लाख ५२ हजार रुपयांची मदत दिली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ४४ हजार ७८२ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ झाला आहे, असे असले तरी फलोत्पादकांना दिलेली मदत तोकडी आहे. अनेक शेतकरी तर त्या मदतीपासूनही वंचित राहिले असल्याची तक्रार आहे.

नगर जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळात उसाचे क्षेत्र वरचेवर कमी होत असून त्याजागी फळबागांचे क्षेत्र वाढत आहे. सध्या सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्राच्या जवळपास फळबागांचे क्षेत्र आहे. दुष्काळी भागासह सर्वच शेतकऱ्यांनी फळपिकांकडे वळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड केली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त असलेल्या जामखेड, पाथर्डी, शेवगाव, नगर, पारनेर, श्रीगोंदे भागांत फळझाडांची लागवड वाढली आहे.

यंदा मात्र दुष्काळाने फलोत्पादक अडचणीत आले आहे. गेल्यावर्षी पाऊस नसल्याचा गंभीर परिणाम झाला, पाणीस्रोत डिसेंबरमध्येच आटले. अनेक शेतकऱ्यांनी विकतच्या पाण्यावर बागा जगवण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांना पैसे खर्चूनही शेवटपर्यंत पाणी देता आले नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणात फळबागा जागेवर जळाल्या.

जिल्हा प्रशासनाने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १८ हजार रुपयाचे अनुदान दिले आहे. मुळात एक एकर बागेला चार दिवसाला टॅंकर लागतो. एका टॅंकरची किंमत चार हजार रुपये मोजावी लागली. अठरा हजार हा एका महिन्याचाच खर्च आहे. बागा जळाल्या ते नुकसान लाखोंच्या घरात आहे. अनेक वर्षांपासून जोपासलेल्या बागेचे नुकसान अठरा हजारात कधीच भरून निघू शकत नाही. तसेच ही तोकडी मदतही काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाभरात ४० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले आहे.

पीक वाया गेलेल्या शेतकऱ्यांनाही मदत द्यावी जिल्ह्यात साधारण ४० ते ४५ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले आहे. बागा जळलेल्यांना मदत मिळाली. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी बहार न धरता केवळ बागा जगविण्याचे धोरण ठेवले. त्या शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मदत दिलेली असली तरी नेमक्या नुकसानीचा प्रशासनाकडे आकडा नाही. कृषी विभागाकडून तर फलोत्पादक बेदखल झाल्यासारखी स्थिती जिल्ह्यात आहे. ज्यांच्या बागा जळाल्या, त्यांना तर मदत द्याच, पण पीक वाया गेलेल्या फलोत्पादकांनाही सरसकट मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.  

मदत दिलेले तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टर), लाभार्थी
नगर   ४५९६.९२ ६१५८
पारनेर  ४७२२.६२ ९१८३
पाथर्डी ३६८४.३८ ९२१०
कर्जत ५९५५.५७ ९०३८
जामखेड ३२५७ माहिती प्राप्त नाही
श्रीगोंदे १९२९ ४०४९
श्रीरामपूर
राहुरी  ५६३ २३४८
नेवासा  २५३६ ३१५४
शेवगाव १५१ १५८९
संगमनेर २८.५५ ५३
अकोले 
कोपरगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com